कोल्हापूर : भाजप मित्रपक्षांचे जिल्ह्यात 300 सरपंच होतील : चंद्रकांत पाटील | पुढारी

कोल्हापूर : भाजप मित्रपक्षांचे जिल्ह्यात 300 सरपंच होतील : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात 7 हजार 600, तर जिल्ह्यात 478 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यात भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष, ताराराणी आघाडी, ताराराणी पक्ष आदी मित्रपक्षांच्या माध्यमातून 300 गावांत सरपंच निवडून येतील, असा दावा भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. सीमाप्रश्न समन्वयाने सुटायला हवा, असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ही निवडणूक ताकदीने लढवून 300 गावांत सरपंच निवडून आणण्याचा निर्धार केला आहे, असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न ताकदीने लढणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात ते म्हणाले, हा काही दोन राष्ट्रांतील संघर्ष नाही. दोन राज्यांतील प्रश्न असून, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दोन दिवस सुनावणी सुरू आहे. त्यासंदर्भात मी स्वत: आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्लील वकिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे. वकिलांना केसबाबत आवश्यक ती मदत आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिली असून, केस ताकदीने लढणार आहोत. कर्नाटकातील 865 गावांतील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात आल्यानंतर ज्या सवलती मिळतील त्या सवलती सर्वोच्च न्यायालयातील निर्णय होईपर्यंत देता येईल का? याबाबत कायदेशीर विचार आणि बैठका सुरू आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे.

धनगर समाजास आरक्षण मिळेपर्यंत ‘एसटी’च्या सवलती

ज्याप्रमाणे ओबीसींच्या सवलती मराठा समाजास दिल्या आहेत, तशा धनगर समाजास आरक्षण मिळेपर्यंत एसटी, एनटींच्या सवलती दिल्या जातील. याचा निर्णय लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेडग-जत पाणी योजना मंजूर

जत तालुक्यातील 12 गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. उर्वरित 45 गावांसाठी 2 हजार कोटींची बेडग ते जत पाणी योजना आणि निधी मंजूर असून, लवकरच काम सुरू होईल. 45 गावांत तलाव व पाईपलाईन टाकणे पूर्ण होईल. मानवी दृष्टिकोनातून समन्वयाने मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलतायत. एकत्रित बसून हा सोडविण्याचा विषय आहे, असे पाटील म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र देणार

मी स्वत: कर्नाटकचे मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांशी बोलून पत्र देणार आहे. त्यामध्ये मराठी शाळांसाठी आणि शहाजीराजे यांच्या स्मारकासाठी निधी वितरित केला जाईल. त्यातून दोघांनी मिळून शहाजीराजेंचे सुंदर स्मारक बनवूया, असे सुचविणार आहे. त्यामुळे आम्ही तेथे मराठी भाषिकांना चिथावणीसाठी नाही तर महाराष्ट्राचे पॅकेज देण्यासाठी येत आहोत, हे त्यांना समजेल. सीमाभागातील मराठी भाषिकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा शिकविण्यासाठी तेथे प्रयत्न करणार आहोत. राज्यपालांसंदर्भात उदयनराजेंनी केंद्रास दिलेल्या पत्राची दखल घेतली का, अशी विचारणा केली असता याबाबत माहिती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. उदयनराजे राजे आहेत. त्यांच्या वक्तव्यावर टिपणी करू नये, असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेस खा. धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नाथाजी पाटील उपस्थित होते.

Back to top button