कोल्हापूर : ...तर कर्नाटकच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात येण्यास बंदी घालू : दीपक केसरकर | पुढारी

कोल्हापूर : ...तर कर्नाटकच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात येण्यास बंदी घालू : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात आमचे सरकार आहे. आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात येण्यास बंदी घालू शकतो. तुम्ही अविचाराने निर्णय घेतला, तसे आम्ही करणार नाही. तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत. मग महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता कशाला, अशा शब्दांत कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला सुनावले. ते पत्रकारांशी बोलत होते.

कोणत्याही धरणाचे पाणी सोडलं की, प्रश्न सुटतो असे नाही. पाणी योजनेसाठी 2 हजार कोटी आम्ही दिले आहेत. कर्नाटककडून सीमा भागातील नागरिकांना कशाप्रकारे वागणूक दिले जाते हे सर्वांना माहीत आहे. कर्नाटकात नागरिकांना बहुभाषा सुविधाही देऊ शकले नाहीत. न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल हा आमचा विश्वास असल्याचे केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हानाची भाषा केली जाते. पण तुम्ही गुन्हा केला म्हणून तुम्ही तुरुंगामध्ये होता. मात्र, सीमावादासाठी शिंदेंनी आंदोलन केलं म्हणून ते कर्नाटकमधील जेलमध्ये 45 दिवस होते , असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लागवला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्याविषयी मी बोलणं योग्य नाही. पैशाने माणसं फुटत असती आणि विकत घेता येत असती, तर सर्व उद्योगपती नेते बनले असते. एकनाथ शिंदे यांच्या मागे लोक का गेले याचा सर्वांनी विचार करायला हवा. अधिवेशन काळात शिंदेंच्या घराकडून सर्व आमदारांना जेवणाचा डबा येत होता, असेही केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे हे आमदारांना प्रेम देऊ शकले नाहीत की भेटूही शकले नाहीत.

त्यांना हिंदुत्व मान्य नव्हतं तर सावरकरांचा झालेला अपमान मान्य होता. मात्र, बाळासाहेब असते तर त्यांना हे सर्व मान्य झालं नसतं. म्हणून आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाले. मागे राहिलेल्या लोकांनाही हे सत्य लवकरच समजेल, असेही केसरकर म्हणाले.

Back to top button