कोल्हापूर : पोलिसांच्या गाडीखाली चिरडून विद्यार्थ्याचा अंत | पुढारी

कोल्हापूर : पोलिसांच्या गाडीखाली चिरडून विद्यार्थ्याचा अंत

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : शहापूर येथे रेल्वे पोलिसांनी तपासासाठी आणलेले खासगी वाहन शाळकरी मुलाच्या अंगावरून गेल्यामुळे राज सुरेश चव्हाण (वय 12, रा. आरोमा बेकरीशेजारी, गणेशनगर शहापूर) या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वाहनचालक सूर्यकांत आप्पासो कांबळे (रा. भारतमाता हाऊसिंग सोसायटी, इचलकरंजी) याच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. अशोक प्रकाश चव्हाण (रा. गणेशनगर, शहापूर) यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.

बालकाच्या नातेवाईकांनी आयजीएम रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला. संबंधित वाहन चालक व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मिरज रेल्वे पोलिसांचे पथक एका गुन्ह्यातील वॉरंट बजावण्यासाठी खासगी वाहनाने शहापूर येथे आले होते. ते माजी नगरसेवकाकडे पत्ता विचारण्यासाठी गेले. ही चारचाकी (एमएच 09 सीएम 0422) रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभी करण्यात आली होती. वाहनाचा हँडब्रेक न लावता चालक निघून गेला. काही वेळातच हे वाहन उतारावरून सुमारे 50 फूट खाली आले. तेथे राज चव्हाण व त्याचा मित्र खेळत होते. मागून वाहन येत असल्याची पुसटशी कल्पनाही राजला आली नाही. तो खेळात मग्न होता. वाहनाने त्याला फरफटत नेले. काही अंतरावरच असलेली मंदिराची भिंत आणि वाहनामध्ये राज अडकला. यामध्ये तो जबर जखमी झाला.

नागरिकांनी तातडीने त्याला बाहेर काढून इचलकरंजीतील एका खासगी इस्पितळात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला इंदिरा गांधी इस्पितळात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे, गावभागचे राजू ताशिलदार, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसुळ, शहापूरचे अभिजित पाटील यांच्यासह पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Back to top button