कसबा बावडा : फडात पाय अन् देणार काय..? | पुढारी

कसबा बावडा : फडात पाय अन् देणार काय..?

कसबा बावडा, पवन मोहिते : यावर्षी ऊस चांगला असतानाही तोडणी-ओढणी मजूर आणि कारखान्यांच्या चिटबॉयसह शेती ऑफिसमधील कर्मचारी शेतकर्‍यांची अडवणूक करत आहेत. ऊसतोड मजुरांकडून आताच फडात पाय आणि देणार काय…? असा प्रश्न विचारला जात आहे. पहिल्या दीड महिन्यातच ही अवस्था असेल, तर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर सुरू झाला. यावर्षी पावसाने साथ दिल्यामुळे ऊस पिके जोमाने वाढली आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍याला काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. काही कारखान्यांनी पहिली उचल ही शेतकर्‍यांच्या नावावर जमा केली आहे. यावर्षी गळीत हंगाम एप्रिलपर्यंत चालतील, अशी स्थिती आहे. ऊसतोडीसाठी मशिनचा वापर मोठमोठ्या प्लॉटवर केला जात आहे; तर छोट्या प्लॉटमध्ये ऊसतोड मजुरांकडून तोडणी केली जात आहे.

ऊसतोड मजूर तोडणीसाठी ज्यावेळी शेतकर्‍याच्या फडात/प्लॉटवर येतात त्यावेळेला फडात पाय ठेवल्या ठेवल्या नकारात्मक गोष्टींना ऊत येतो. मालक गाडी बाहेर काढायला जागा नाही, वाट नाही, उसाला वाढ नाही, किती देता बोला. उसाच्या गाड्या शेतातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा ट्रॅक्टर मागवावा लागतो. काही अडचणीच्या ठिकाणी तर शेतकर्‍याला घेरले जाते. यामध्ये कारखान्यांच्या चिटबॉयचाही तितकाच समावेश असतो. मालक तुम्ही त्यांना काही देऊ नका, असे एकीकडे म्हटले जाते; पण दुसरीकडे हेच चिटबॉय आणि शेती विभागातील कर्मचारी सायंकाळी गाडीअड्ड्यावर याच ऊसतोड मजुरांसोबत दिसतात.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या या मुख्य अडचणीकडे कोणाचेही लक्ष नाही. याबाबत शेतकरी कारखान्यांच्या व्यवस्थापनांकडे तक्रार करायला गेल्यानंतर सर्व काही नियमाप्रमाणे सुरू आहे, अशी उत्तरे दिली जातात. सत्ताधारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत; तर विरोधक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

‘ऊस तुझ्याच नावावर घाल’

ऊस उत्पादक शेतकर्‍यांची ऊसतोड मजुरांकडून अडवणूक बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात होत आहे. करवीरमधील एका उसाच्या फडात उसाच्या तोडीसाठी आलेल्या मजुरांनी ऊस उत्पादक शेतकर्‍याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. यावर वैतागून शेतकरी म्हणाला, ‘तुमची मागणी मी पूर्ण करू शकत नाही. माझा फड रिकामा कर; ऊस तुझ्याच नावावर घाल.’

Back to top button