देशात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा वाढता धोका | पुढारी

देशात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा वाढता धोका

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : हवेतील वाढत्या प्रदूषणाने भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. जगातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. शिवाय, कर्करोगाने मृत्युमुखी पडणार्‍या भारतातील रुग्णांपैकी 9.3 टक्के मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित रुग्णांचे होतात. यामुळे या असंसर्गिक रोगाच्या वाढीला रोख लावायचा असेल, तर हवेच्या प्रदूषणावर गांभीर्याने विचार आणि जलद कृती करण्याची वेळ निर्माण झाली आहे, असा इशारा कर्करोगाच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍या तज्ज्ञांनी दिला आहे.

‘फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जागृती, प्रतिबंध आणि उपचारातील आव्हाने’ या विषयावर असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया (अ‍ॅस्पचाम) यांच्या वतीने एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित रुग्णसंख्येत होणार्‍या वाढीवर चिंता व्यक्त करण्यात आली. जगातील सर्वाधिक वायू प्रदूषणाने ग्रस्त असलेल्या 100 शहरांपैकी 63 शहरे एकट्या भारतात असल्यामुळे वायू प्रदूषणामध्ये लपेटून जाणारा भारत वाचविण्यासाठी तातडीने हालाचाली करण्याची आवश्यकता असल्याची गरजही या परिषदेत व्यक्त करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅसोचामच्या वेलनेस कौन्सिल आणि सर गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डी. एस. राणा होते.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक (9.3 टक्के) असल्याचे स्पष्ट करताना भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णसंख्येत फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित रुग्ण 6.9 टक्क्यांवर म्हणजेच ही रुग्णसंख्या 70 हजार 275 वर जाऊन पोहोचली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 2025 मध्ये ही रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा धोका असल्याने त्याविषयी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, असा इशाराही या परिषदेत देण्यात आला.

ही आहेत लक्षणे

सतत खोकला येणे आणि हा खोकला उत्तरोत्तर अधिक वाढणे, खोकताना छातीत कळा येणे, आवाजात बदल होणे, श्वासोच्छ्वासास त्रास होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे आणि वजन कमी होणे आदी फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. यावर योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, असा विश्वास देताना परिषदेत यावर उपचारपद्धती म्हणून मोलॅक्युलर लॅबचा वापर, अत्युच्च पद्धतीची रेडिएशन थेरपी देणारी उपकरणे स्थापित करणे याची मोठी गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Back to top button