सोन्याचा अंश असल्याच्या कोल्हापूरच्या अधिकार्‍याचे संशोधन 34 वर्षांनी मान्यतेच्या मार्गावर | पुढारी

सोन्याचा अंश असल्याच्या कोल्हापूरच्या अधिकार्‍याचे संशोधन 34 वर्षांनी मान्यतेच्या मार्गावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भात सोने आणि प्लॅटिनमसह मौल्यवान धातू असल्याचा दावा कोल्हापुरात कार्यरत असलेले खनिकर्म विभागाचे तत्कालीन अधिकारी रामसिंग हजारे यांनी 1988 साली केला होता. या त्यांच्या संशोधनाला 34 वर्षांनंतर मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सिंधुदुर्ग व चंद्रपूरमधील खाणींतून सोने दडले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता पुढच्या कार्यवाहीकडे लक्ष लागून राहिले आहे.

कोकणात होत असलेल्या खाणकामात सोन्याचा अंश असल्याची पहिली बातमी 1988 साली प्रसिद्ध झाली. या 34 वर्षांच्या प्रवासात अनेक घटना, घडामोडी घडल्या. ज्यांनी हे सारे सोने भारत सरकारच्या तिजोरीत जमा व्हावे, यासाठी प्रयत्न केले. त्याची दखल कोणीच घेतली नाही. अखेर 34 वर्षांनी या सोन्याच्या शोधाची आता शासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

गोव्यापासून ते कर्नाटकपर्यंत जे खाणकाम सुरू होते. त्यामध्ये सोने, प्लॅटिनमसह मौल्यवान धातू असल्याचा दावा कोल्हापुरात खनिकर्म विभागात अधिकारीपदावर असलेल्या रामसिंग हजारे यांनी केला होता. अनेक प्रयोगशाळांत तेथील उत्खननाची चाचणी घेऊन त्यांनी हे सप्रमाण सिद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. 1988 च्या बातमीनंतर अनेकांचे त्याकडे लक्ष लागले.

काही काळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संदुरा नावाच्या पट्ट्यात अधिक प्रमाणात सोन्याचे प्रमाण असल्याचे व काही प्रमाणात प्लॅटिनमसह अन्य धातू असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला. या संशोधनाला मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र असले पाहिजे, तेव्हाच आपला दावा सिद्ध करता येईल, या भूमिकेतून पुढे प्रयत्न सुरू झाले. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून कळणे, तिरोडा, रेड्डी आदी परिसरातील उत्खनन तपासण्याची तयारी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्रा. एम. जी. ताकवले यांनी दाखविली. त्यानंतर यासाठीची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाने सुरू केली. स्वतः ताकवले यांच्या पुढाकाराने खाणीतून नमुने घेण्यात आले. त्याची शिवाजी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यातून हजारे यांच्या संशोधनाना बळकटी पुरविणारे निकाल समोर आले. मात्र, संशोधक एका निकालावर थांबत नाहीत. प्रा. ताकवले यांनी हे नमुने आणि शिवाजी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील निष्कर्ष नामांकित अशा ‘कोलार गोल्ड फिल्ड’ या सोन्याच्या खाणीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. त्यांनीही शिवाजी विद्यापीठाच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले.

या उत्खननात सोने, प्लॅटिनम यासह मौल्यवान धातू आढळतात, असा निष्कर्ष कोलार गोल्ड फिल्डच्या प्रयोगशाळेने दिला. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजीराव देसाई यांनीही यासाठी प्रयत्न केले. हा पाठपुरावा करण्यात पत्रकार उदय कुलकर्णी यांचाही सहभाग होता. प्रा. ताकवले यांनी या उत्खननाच्या निष्कर्षाची प्रत त्यांना दिली होती.

या निष्कर्षाचा शासकीय पातळीवर पाठपुरावा केला. तत्कालीन मंत्री, अधिकारी यांच्याकडे त्याचे अहवाल पाठविण्यात आले. मात्र, गेल्या 34 वर्षांत याकडे दुर्लक्षच करण्यात आले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हा मुद्दा पुढे आणल्याने यापुढच्या काळात याबाबत प्रत्यक्ष पावले पडण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, कोलारच्या खाणीतून सोने काढण्यासाठी एक ते दीड किलोमीटर खोलवर जावे लागते; मग अत्यंत कमी खोलीवर व कोलारपेक्षाही अधिक प्रमाणात एक टन उत्खननातून सोने मिळत असल्याचे संशोधनातून समोर आल्याचा दावा केला आहे.

Back to top button