कोल्हापूर : 474 सरपंचपदासाठी 2,702 उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

कोल्हापूर : 474 सरपंचपदासाठी 2,702 उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत सरपंचपदाकरिता 2 हजार 677 उमेदवारांचे 2 हजार 702 सदस्यपदासाठी 16 हजार 520 उमेदवारांचे 16 हजार 691 एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सरपंचपदासाठी 1 हजार 324 तर सदस्य पदासाठी 8 हजार 719 अर्ज दाखल झाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढविण्यात आल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत अर्ज दाखल करून घेण्यात येत होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. साडेपाच नंतर उमेदवार वगळता सर्वांना कार्यालयातून बाहेर घालवण्यात आले. यावेळी काही ठिकाणी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. साडेपाचनंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला होता. तरीही आता जाण्याचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिस अडवत होते. त्यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले.

जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी दि. 28 नोव्हेंबरपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती; परंतु अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण यंत्रणेला ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब होत होता. म्हणून उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी शुक्रवारी उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्यास परवानगी देत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ देखील अडीच तासांनी वाढविली.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता उमेदवारांची धावपळ सुरू होती. सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पोलिस केवळ उमेदवारांनाच प्रवेश देत होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यालयाच्या परिसरात खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आल्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.

81 वर्षांच्या इंदुबाई निवडणूक रिंगणात

कणेरीमठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इंदुबाई लोखंडे या 81 वर्षीय महिलेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. आपण निवडणूक लढविणार असून त्यामध्ये विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोमवारी छाननी

उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी (दि.5) करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता छाननीस सुरुवात होणार आहे.

Back to top button