कोल्हापूर : इथेनॉल प्रकल्पनिर्मिती गतिमान करण्याची गरज | पुढारी

कोल्हापूर : इथेनॉल प्रकल्पनिर्मिती गतिमान करण्याची गरज

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : भारताची 2030 मध्ये पेट्रोलची मागणी 56 हजार 236 दशलक्ष लिटर्स इतकी असणार आहे. या मागणीच्या तुलनेत पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रण करावयाचे झाले, तर सुमारे 1 हजार 125 कोटी लिटर्स इथेनॉलची गरज आहे. ही गरज भरून काढून 20 टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असेल, तर केंद्र सरकारला इथेनॉल निमिर्र्तीचे प्रकल्प गतिमान करण्यासाठी धडक मोहीम राबवावी लागेल. अन्यथा 2025 मध्ये हे उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येऊ शकतात, असा एक अहवाल मिझोरामच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) तज्ज्ञ गटाने दिला आहे.

केंद्राच्या पातळीवर गेल्या 6 वर्षांपासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहनात्मक योजना राबवण्यात येते आहे. या योजनेंतर्गत 2022 अखेर पेट्रोलमधीलमधील 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. या उद्दिष्टाची पूर्ती 6 महिने अगोदरच झाली. यानंतर केंद्राने 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टासाठी निर्धारित केलेली 2030 अखेरची मुदत 2025 सालापर्यंत मागे आणली आहे. तथापि, प्रत्यक्ष 2025 मध्ये देशात पेट्रोलची मागणी किती असेल आणि त्याच्या 20 टक्के मिश्रणासाठी किती इथेनॉलची आवश्यकता आहे, याविषयी कोणताही अधिकृत अभ्यास पुढे नव्हता.

एनआयटी मिझोरामने अनेक गणितीय प्रारूपांचा अभ्यास केला. त्यासाठी 1997 ते 2021 या कालावधीत देशातील पेट्रोलच्या वापराचा आधार घेण्यात आला. अशी अनेक गणितीय प्रारूपे मांडून त्यांनी 2030 मधील देशातील पेट्रोलची मागणी किती असेल, याचा अंदाज बांधला आहे. यानुसार 20 टक्के मिश्रणासाठी सुमारे 1 हजार 125 कोटी लिटर्स इथेनॉलची आवश्यकता असल्याचे अनुमान काढले असून त्याच्या पूर्ततेसाठी केंद्राने इथेनॉल उपलब्धतेसाठी आपली गती वाढविण्याची गरज प्रतिपादित केली आहे.

निविदेला प्रतिसाद मिळण्याची स्थिती नाही

भारतात इथेनॉलचा वापर हा मद्यार्क उद्योग, औद्योगिक कारणांसाठी आणि पेट्रोलमधील मिश्रणाद्वारे इंधन म्हणून केला जातो. सध्या भारताची स्थापित क्षमता 1 हजार कोटी लिटर्सच्या घरात पोहोचली आहे. चालू वर्षीच केंद्राने एकत्रित सुमारे 900 कोटी लिटर्स क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प प्रगतिपथावर असले, तरी प्रत्यक्ष त्यातून इथेनॉल निर्मिती होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. याखेरीज मद्यार्क निर्मिती उद्योगासाठी वार्षिक 200 कोटी लिटर्स इथेनॉलची गरज गृहीत धरली, तरी ऑईल कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या 935 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीच्या निविदेला संपूर्णपणे प्रतिसाद मिळेल, अशी सध्या स्थिती नाही.

Back to top button