कोल्हापूर : सावधान, वारणा नदीकाठ ढासळतोय! | पुढारी

कोल्हापूर : सावधान, वारणा नदीकाठ ढासळतोय!

कुंभोज, सचिन भानुसे : येथील कुंभोज-बुवाचे वाठार रस्त्यावरील मासुर्ले पाणंद परिसरातील वारणा नदीकाठ खचू लागला आहे. काठावरील जमिनाचा काही भाग दरवर्षी महापुरामुळे ढासळू लागला आहे. परिणामी, या परिसरातील शेतकरी व पाणीपुरवठा संस्थांचे नुकसान होत आहे.

येथील वारणा नदी काठावरील जमीन खचल्यामुळे आळतेच्या कुंथूसागर सहकारी पाणीपुरवठा व वैभव लक्ष्मी सहकारी पाणी पुरवठ्याच्या जॅकवेलला धोका निर्माण झाला आहे. जॅकवेलच्या जमिनीचा काही भाग खचल्याने जॅकवेल धोकादायक स्थितीत सध्या उभे आहे. या दोन्ही संस्थांच्या पाणी पुरवठ्याच्या साहित्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही पाणीपुरवठा संस्थांचा पाणीपुरवठा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे आळते येथील या दोन्ही पाणीपुरवठा संस्थांवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी नसल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे हळूहळू वारणा नदीकाठच्या जमिनीची सुपिकता व निसर्ग सौंदर्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. महापुरामुळे प्रत्येक वर्षी नदीकाठच्या जमिनीचा भाग खचू लागल्याने शेतकर्‍यांच्या जमिनीचे व पाणीपुरवठा संस्थाच्या जॅकेवलचे नुकसान होत आहे. नदीकाठची जमीन खचत चालल्याने विद्युत पोल, पाणीपुरवठा संस्थांचे जॅकवेलवरील साहित्याला धोका निर्माण होत असल्याने प्रत्येक वर्षी पाणीपुरवठा संस्थांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वारणा नदी वाहते. मासुर्ले पाणंद येथील वारणा नदीचे पात्र अरुंद असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे कुंभोज हद्दीतील मासुर्ले पाणंद परिसरातील नदी काठावरील जमीन कातरू लागली आहे.

Back to top button