कोल्हापूर : ‘त्या’ 24 कुटुंबांची चूल कशी पेटणार;संसारच आला रस्त्यावर | पुढारी

कोल्हापूर : ‘त्या’ 24 कुटुंबांची चूल कशी पेटणार;संसारच आला रस्त्यावर

कोल्हापूर; डॅनियल काळे :  शिवाजी पार्क येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील झोपड्या मंगळवारी आगीत जळून खाक झाल्या होत्या. या झोपडपट्टीतील 24 कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्याचे आव्हान आहे. सरकारी मदत ही वेळकाढूपणामध्ये किती वेळ अडकेल हे माहीत नाही. परंतु, या गोरगरिबांना आता सामाजिक दातृत्वाची गरज आहे. समाजानेही या कुटुंबांना हातभार लावण्याची गरज आहे. घटनेच्या दुसर्‍या दिवशीही घटनास्थळावर सावरण्याचा प्रयत्न सुरू होता. सगळेच जळून खाक झाले आहे. सगळेच पुन्हा नव्याने उभा करावे लागणार आहे.

इंदिरानगर झोपडपट्टी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गोरगरीब सोनझारी समाज येथे राहतो. कानातील मळ काढणे, तांब्याच्या अंगठीसह इतर काही वस्तू विकणे हा येथील लोकांचा व्यवसाय आहे. बुधवारच्या घटनेने काही संसारच बेचिराख झाले आहे. आता हे संसार उभे करण्याची आवश्यकता आहे. या समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी म्हणाले, शासनाने या कुटुंबीयांना मदत तातडीने करण्याची गरज आहे. गोरगरीब लोक आहेत. सध्या काय खायचे? कोठे थांबायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित लोखंडे म्हणाले, काही लोक मदतीसाठी पुढे येत आहेत, त्यांचे धन्यवादच. पण या आगीत मोठे नुकसान झाले आहे. झोपड्यांपासून ते भांडी कुंड्यापर्यत सर्वच द्यावे लागणार आहे.

माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, शिवाजी पार्कातील काही नागरिकांनी साहित्य स्वरूपात वेगवेगळी मदत पोहोचवली आहे.आणखीन काही मदत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. माजी नगरसेवक आशिष ढवळे म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांसाठी साड्या व इतर संसारउपयोगी साहित्य दिले आहे. ‘रोटरी’कडून संसार कीट येणार आहे. संसार रूटिनवर आणण्याचा प्रयत्न आहे.

समाजाने पुढे येण्याची गरज

शासकीय मदत मिळण्यासाठी काही वेळ लागेल. त्यामुळे लोकांना तातडीने मदत देण्यासाठी आता समाजानेच पुढे येण्याची गरज आहे. तरच या 24 कुटुंबातील लोकांच्या काही प्राथमिक गरजा भागणार आहेत. अंगावरच्या कपड्यानिशी ही कुटुंबे तशीच रस्त्यावर बसून आहेत. त्यामुळे या कुटुंबाना मदतीची गरज लागणार आहे.

उघड्यावरच संसार

इंदिरानगर झोपडपट्टीतील आगीनंतर संसारच उघड्यावर पडला आहे. त्यामुळे महिला, पुरुष रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते. जळलेल्या झोपड्या कशा उभ्या करायच्या, याची काळजी त्यांना लागली होती. विशेषतः महिला वर्ग चिंतेत होता. सकाळपासून काही लोक विविध प्रकारची मदत करत होते. काय गरज आहे, याची विचारणा करत होती. मुले भेदरून गेली होती. काही बंगलेमालकांनी रिकाम्या जागेत, संरक्षक भिंतीलगत काही जणांना आसरा दिला होता.

Back to top button