कोल्हापूर : पंंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी 686 कोटींचा आराखडा तयार | पुढारी

कोल्हापूर : पंंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी 686 कोटींचा आराखडा तयार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांतून निधी आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी 686 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असल्याचे सांगितले. दरम्यान, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रकल्प अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल यांनी दिल्या.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजनांबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रादेशिक अधिकारी जे. एच. साळुंखे, एमआयडीसीचे विशेष कार्यकारी अधिकारी एस. बी. पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी, प्रदूषणमुक्तीसाठी करण्यात येत असलेल्या उपायांची माहिती दिली.

राजेश क्षीरसागर म्हणाले, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठीचे प्रकल्प नियमित राबवून प्रदूषण नियंत्रणासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. या दृष्टीने त्या त्या विभागांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा. जेणेकरून या अहवालातील बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करून पंचगंगेचे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात यश येईल.

यावेळी प्रधान सचिव संजीव जैसवाल यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथील किती सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिसळते याची माहिती घेतली. तसेच किती पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत मिसळते, याचा आढावा घेतला. शहराला संलग्नित असणार्‍या ग्रामीण भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा महापालिकेने विचार करावा, असे सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, इचलकरंजी महानगरपालिका व संबंधित यंत्रणांनी नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांचा अभ्यास करून विभागीय आयुक्तांमार्फत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा. घरगुती सांडपाण्यावर सनियंत्रण प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आराखडा स्थानिक स्वराज्य संस्थांनी सादर करावा, अशा सूचना दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन करून वेळोवेळी अहवाल सादर करण्यात आले आहेत असे सांगिलते. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, कार्यकारी अभियंता अतुल डोरे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार उपाययोजना

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी यापूर्वी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर नव्याने सादर करण्यात आलेल्या आराखड्यात कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात 35 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे चार प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे सांगितले. यासाठी 415 कोटी 57 लाख रुपयांचा, तर इचलकरंजीसाठी सुमारे 271 कोटी रुपयांचा असा एकूण 686 कोटी 57 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार घटकांची सादरीकरणाद्वारे माहिती

जिल्हाधिकारी रेखावार यांनी पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार घटक व उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेमधील 171 गावांपैकी 39 गावांतून सांडपाणी, उद्योगधंदे या पंचगंगा खोर्‍यातील घटकांद्वारे 182.4 दशलक्ष लिटर दरदिवशी सांडपाणी तयार होते. यापैकी 136.3 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर 46.3 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याने हे घटक नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका व गावांमधील घरगुती सांडपाण्यावर तसेच कारखान्यांमधील सांडपाण्यावर अद्ययावत प्रकिया प्रकल्प उभारण्यासाठीचा अंदाजित आराखड्याबाबत जिल्हाधिकारी रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी माहिती दिली.

Back to top button