संजय भोसले, सोळंकी यांच्याकडून 92 लाखांचे आर्थिक नुकसान | पुढारी

संजय भोसले, सोळंकी यांच्याकडून 92 लाखांचे आर्थिक नुकसान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेचे तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले आणि प्रभारी सहायक अधीक्षक दीपक सोळंकी यांनी घरफाळ्यातून महापालिकेचे तब्बल 92 लाख 76 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. महापालिका प्रशासनाने त्यासंदर्भात दोघांवर ठपका ठेवला असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिली.

लाड व काळे यांच्यावरही 8 लाख निश्चित…

भोसले यांनी 25 लाख 61 हजार 15 रुपये, तर सोळंकी यांनी 67 लाख 14 हजार 987 रु. आर्थिक नुकसान केले आहे. चौकशी समितीने दोघांवरही आर्थिक नुकसानीची रक्कम निश्चित केली असून त्यासंदर्भात नोटिसाही बजावल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील तत्कालीन प्रभारी अधीक्षक राहुल लाड व क्लार्क सागर काळे यांच्यावरही सुमारे 8 लाख इतकी रक्कम निश्चित केल्याचे समजते.

भोसले यांनी वरिष्ठांचे न्याय व रास्त आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन करणे, महापालिकेच्या आर्थिक हितास बाधा पोहोचेल असे कृत्य करणे, अधिनस्त कर्मचारी-अधिकारी यांच्याबरोबर संगनमत करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करणे, प्रत्यायोजित करण्यात आलेल्या अधिकारांच्या मर्यादेचा भंग करून बेकायदेशीरपणे व अनाधिकाराने वरिष्ठांच्या अधिकारांचा वापर करून महापालिकेच्या कागदपत्रात व त्या अनुषंगाने संगणकीय नोंदीमध्ये परस्पर फेरफार करणे, खात्याच्या आर्थिक मालमत्तेशी लांडीलबाडी करणे, आर्थिक नुकसान करणे, कार्यालयीन शिस्त व नियमांचा भंग करणे, महापालिकेच्या नावलौकिकास बाधा पोहोचेल असे गैरकृत्य करून भोसले यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. सोळंकी यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे अत्यंत महत्त्वाच्या घरफाळा विभागात व महापालिकेच्या लौकिकास बाधा आणणे असे गंभीर गैरकृत्य करून त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे, असा ठपका भोसले व सोळंकी यांच्यावर ठेवला आहे, असेही शेटे यांनी सांगितले.

Back to top button