कोल्हापूर : फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! | पुढारी

कोल्हापूर : फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

कोल्हापूर, प्रवीण मस्के : अभियांत्रिकी, कृषी पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, डिसेंबर महिना उजाडला तरी फार्मसी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणीच सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रवेश होऊन कॉलेज सुरू कधी होणार? या धास्तीने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

गेल्या वर्षी कोरोना असतानाही सप्टेंबरपर्यंत बी.फार्मसी व डी.फार्मसीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली होती. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अस्तित्वात असणार्‍या फार्मसीच्या पदवी, पदव्युतर अभ्यासक्रम शिकविणार्‍या महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतांना मान्यता दिली नाही. आरक्षणानुसार उपलब्ध जागांचे वाटप झाले नसल्याने प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. काही कॉलेजना उशिराने मान्यता दिली, काहींची अद्याप बाकी आहे. काही संस्थांनी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविले; परंतु अद्याप महाविद्यालयांची तपासणीच झाली नसल्याने मान्यता मिळाली नसल्याचे चित्र आहे.

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 17 बी.फार्मसी व 20 हून अधिक डी.फार्मसी कॉलेज आहेत. यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत फार्मसीच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणीसाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने 30 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेशांच्या तीन फेर्‍यांसाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. उशिरा कॉलेज सुरू झाले तर सत्र कधी सुरू होणार व कधी संपणार? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ प्रवेश सुरू करावेत, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत आहे.

डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्येही साशंकता

डिप्लोमा इन फार्मसीची नोंदणी प्रक्रिया 9 जून रोजी सुरू झाली. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. प्रक्रिया रखडल्याने डिप्लोमाला प्रवेश कधी पूर्ण होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता आहे. प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.

Back to top button