कोल्हापुरातील झोपडपट्टीवासीयांची सुरक्षा ऐरणीवर | पुढारी

कोल्हापुरातील झोपडपट्टीवासीयांची सुरक्षा ऐरणीवर

कोल्हापूर, सतीश सरीकर : बाहेरच्या गावातून पोटापाण्यासाठी फिरत फिरत ते कोल्हापूरात आले. आसरा म्हणून रिकाम्या माळावर पालं उभारली. कालांतराने त्याचे शेड झाले. मग, एकाचे दोन आणि दोनाचे दहा शेड उभारली. अशाप्रकारे त्या माळावर, रिकाम्या जागेत कष्टकर्‍यांची झोपडपट्टीच तयार झाली. कोल्हापुरात अशाप्रकारे तब्बल 54 झोपडपट्ट्या आहेत. अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीवासीयांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.

कोल्हापूर शहरात अधिकृत 54 झोपडपट्ट्या आहेत. गेल्या 50 वर्षांत शहराच्या विविध भागांत या झोपडपट्ट्या विस्तारलेल्या आहेत. त्यापैकी 44 झोपडपट्ट्या घोषित आहेत. उर्वरित 10 अघोषित झोपडपट्ट्या आहेत. शहरातील 20 हजारांवर झोपड्यांमध्ये सुमारे एक लाखावर नागरिक वास्तव्य करत आहेत.

बहुतांश झोपडपट्टीत छोटी अ‍ॅम्ब्युलन्स जाण्यासाठीही जागा नाही. अनेक ठिकाणी रस्त्याकडेच्या पहिल्या भिंतीपासून ते गल्ली संपेपर्यंत एकमेकांच्या भिंतीला जोडूनच झोपडीवजा घरे आहेत. काही ठिकाणी पत्र्याचे शेड तर काही ठिकाणी कौलारू घरे आहेत. विचारे माळसारख्या झोपडपट्टीत आता आरसीसी घरे बांधण्यात आली आहेत. परंतु, त्याच ठिकाणी शाहू कॉलेजसमोर अत्यंत दाटीवाटने घरेही आहेत. हमाल, गवंडी, सेंट्रिंगसह कचरा गोळा करणे आणि इतर कष्टाची कामे करून दिवसभर काबाडकष्ट करणारे झोपडपट्टीत राहून जीवन जगत आहेत.

शिवाजी पार्कातील इंदिरानगर झोपडपट्टीत दुर्घटना घडली. आगीत तब्बल वीस झोपड्या जळून अक्षरशः खाक झाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, हातावरचे पोट असलेल्या गोरगरिबांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यातून उभारी घेण्यासाठी पुन्हा त्यांना जीवाचे रान करावे लागणार आहे.

शहरात राज्य शासनाच्या जमिनीवर 19 झोपडपट्या आहेत. यात कसबा बावड्यातील मातंग वसाहतीमध्ये 230 झोपड्या असून 250 कुटुंबे राहतात. लक्षतीर्थ वसाहतीमधील तोफेचा माळ या ठिकाणी 50 झोपड्या असून 600 कुटुंबे वास्तव्य करतात. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये 1250 झोपड्या आहेत. येथे 1300 कुटुंबांची घरे आहेत. कसबा बावड्यातील संकपाळ नगरात 195 झोपड्यांतून 237 कुटुंबे राहतात. कोटीतीर्थ तलाव परिसरातील यादवनगरात 1000 झोपड्यांतून 1128 कुटुंबे वास्तव्यास आहेत. राजारामपुरी परिसरातील अवचितनगरात 2200 झोपड्यांतून 2600 कुटुंबीयांनी घरे केली आहेत. कसबा बावड्यातील भगतसिंह वसाहतीमध्ये 130 झोपड्या असून 156 कुटुंबे राहतात. यादवनगरातील डोंबारवाडा या ठिकाणी 100 झोपड्या असून 115 कुटुंबे आहेत.

विचारेमाळमध्ये 1135 झोपड्या असून या ठिकाणी 1425 कुटुंबांनी वास्तव्य केले आहे. संभाजीनगरमधील वारे वसाहतीत 110 झोपड्या असून 140 कुटुंबे आहेत. सदर बाजारातील मार्कस भोसले वसाहतीमध्ये 42 झोपड्यांतून 95 कुटुंबे राहतात. कसबा बावड्यातील शुगर पाणंदीत 73 झोपड्यांतून 100 कुटुंबे वास्तव्य करत आहेत. रंकाळा परिसरातील गायरानमध्ये 190 झोपडपट्यातून 210 कुटुंबांची घरे आहेत. स्टेशन रोडवरील घोरपडे गल्ली परिसरात 91 घरांतून 12 कुटुंबे राहतात. शेंडा पार्कमधील स्वाधारनगरात 126 झोपड्यांतून 126 कुटुंबे वास्तव्य करत आहेत. रेसकोर्स नाका परिसरातील कामगार चाळीच्या पिछाडीस 25 घरांतून 29 कुटुंबे राहतात. बापट कॅम्प परिसरात 72 झोपड्यांतून 72 कुटुंबे आहेत. रमणमळ्यातील शासकीय धान्य गोदामाजवळ 25 झोपड्यांत 25 कुटुंबे, तर साईक्स एक्स्टेंशन परिसरात 55 झोपड्यांतून 64 कुटुंबे वास्तव्य करत आहेत.

खासगी जमिनीवरील झोपडपट्ट्या व झोपड्यांची संख्या

कनाननगर – 435, माकडवाला वसाहत – 225, जामसांडेकर माळ – 263, मार्केट यार्डमधील अंबिका प्लास्टिक इंडस्ट्रीजवळ – 93, रमणमळा – 172, कंझारभाट वसाहत-मोतीनगर – 125, फासेपारधी वसाहत, राजेंद्रनगर – 45, मोरेवाडी परिसर – 39, फे्ंरडस् कॉलनी, शिवाजी पार्क – 70, सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर – 384.

एकूण झोपडपट्ट्या – 54
घोषित झोपडपट्ट्या – 44
अघोषित झोपडपट्ट्या – 10
शासन जमिनीवरील – 19
मनपा जमिनीवरील – 23
खासगी जमिनीवरील – 12

Back to top button