पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरण, विद्युत दाहिनीचा प्रस्ताव द्या : खा.धनंजय महाडिक | पुढारी

पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरण, विद्युत दाहिनीचा प्रस्ताव द्या : खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 दोन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूरआहे. आता पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प आदी ठिकाणी विद्युत दाहिनी बसविण्याचा प्रस्ताव द्यावा, तसेच पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ‘पेट’साठी विद्युत दाहिनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावी, अशी सूचना खा.धनंजय महाडिक यांनी केली.

महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात रविवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना विभागाचे सहायक संचालक महाजन, माजी नगरसेवक सत्यजित कदम, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.

पंचगंगा स्मशानभूमीतील 36 दहन बेड अपुरे पडत असून, ते 60 केले जाणार आहेत. या विस्तारीकरणासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर आहेत, असे अधिकार्‍यानी सांगितले. यावर खा. महाडिक यांनी या ठिकाणी विद्युत दाहिनी बसविण्याचे नियोजन करा. पंचगंगा स्मशानभूमीसह कदमवाडी, कसबा बावडा, बापट कॅम्प या ठिकाणी विद्युत दाहिनीसह पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र (पेट) विद्युत दाहीनीचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना केली. केएमटी तोट्यात आहे. केएमटीच्या ताफ्यात ई-बस घेण्यासाठी प्रस्ताव द्यावा. शहराची लोकसंख्या कमी पडत असल्याने केंद्रातून निधी उपलब्ध होत नाही. यासाठी केएमटीने शहराच्या परिघात होणार्‍या प्रवास आणि संबंधित गावांतील लोकसंख्या या आधारे केंद्राकडे इलेक्ट्रिक बसेस मागणीचा प्रस्ताव द्यावा, त्याचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही खा. महाडिक यांनी दिली.

महापालिकेची शहरात 12 नागरिक आरोग्य केंद्रे आहेत. आणखी 12 केंद्रे प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर ई वॉर्डात महापालिकेतर्फे प्रसूतिगृह उभारण्याची सूचना माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली.

शहरातील मैदाने विकसित कण्याबरोबरच मुक्त सैनिक वसाहत आणि रुक्मिणीनगर येथील मैदान विकसित करण्याच्या सूचना दिल्या. हॉकी स्टेडियमसाठी निधी उपलब्ध आहे. त्याचा विनियोग करून विकासकामे सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी ड्रेनेज विभागाने नियोजन केले आहे. तसेच रंकाळा सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे 9 कोटी रुपये मंजूर आहेत. महावीर उद्यान आणि हुतात्मा पार्क या उद्यानांच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर असून कामे सुरू आहेत.

परीख पुलाजवळ अंडरपासचे नियोजन आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल. तसेच फूट ओव्हर ब—ीजचे रखडलेले कामही मार्गी लावण्यासाठी केंद्रात पाठपुरावा करण्यात येईल, असे खा. महाडिक यांनी सांगितले.

सयाजी हॉटेलशेजारील केएमटीच्या जागेचा खासगी आराम बसेसच्या पार्किंगसाठी प्रस्ताव द्यावा, तसेच हॉकी स्टेडियशेजारील प्रॅक्टिस टर्फसाठी 7 कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खा. महाडिक यांनी दिली.

तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाण पुलासाठी प्रयत्न

तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाणपुलाचे नियोजन करता येईल याची चाचपणी करून प्रस्ताव द्या. त्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले. गोकुळ हॉटेलजवळ स्वयंचलित बहुमजली पाकिर्र्ंग करण्याचे प्रस्तावित असल्याचे शहरातील पाकिर्र्ंगबाबत बोलताना अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच केएमटीच्या अन्य जागेवर पाकिर्र्ंगचे नियोजन करा, अशी सूचना केली.

Back to top button