कोल्हापूर : ‘दामदुप्पट’च्या साखळीतील सोनेरी टोळीगायब; दरमहा काही कोटींत एजंटांचे उत्पन्न | पुढारी

कोल्हापूर : ‘दामदुप्पट’च्या साखळीतील सोनेरी टोळीगायब; दरमहा काही कोटींत एजंटांचे उत्पन्न

कोल्हापूर;दिलीप भिसे :  दामदुपटीचे आमिष दाखवून दीड लाखावर गुंतवणूकदारांकडून कोट्यवधीची कमाई करून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असलेल्या शाहूपुरीतील ‘त्या’ बहुचर्चित कंपनीचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टरसह दरमहा कोट्यवधीच्या कमाईच्या यादीतील ‘टॉपटेन’ एजंट गायब झाले आहेत. घरात पत्ता नाही… मोबाईलही नॉट रिचेबल… लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे काय होणार, या प्रश्नचिन्हाने गुंतवणूकदार हतबल झालेले असताना साखळीतील एजंट एकाचवेळी पसार झाल्याने गुंतवणूकदारांसह कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अल्पकाळात जादा परतावा, आकर्षक गिफ्टच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणार्‍यांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नुकतेच केले होते. शाहूपुरी येथील ‘त्या’ कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत शुक्रवार पेठ येथील रोहित सुधीर ओतारी (धनवडे गल्ली) यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक बलकवडे व शाहूपुरी पोलिस ठाण्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

पोलिसांकडून टाळाटाळ

शिवाजी पेठ, राजारामपुरी, शाहूपुरीसह ग्रामीण भागातील 182 जणांची शाहूपुरीतील ‘त्या’ बहुचर्चित कंपनीने 4 कोटी 76 लाखांची फसवणूक केली आहे. कंपनीच्या प्रमुखांसह साखळीतील एजंटांच्या नावानिशी तक्रार अर्ज दाखल करूनही गुरुवारअखेर संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. फसवणूकीबाबत तक्रारी दाखल करून घेण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचना असतानाही स्थानिक यंत्रणांमार्फत टाळाटाळ होत असल्याने गुंतवणूकदारांतून संताप व्यक्त होत आहे.

सोनेरी टोळींची पुढच्या दहा पिढ्यांची कमाई

परदेशी टूर, आकर्षक भेटवस्तूंसह गुंतवणुकीवर अल्पकाळात दामदुप्पट, तिप्पट कमाईच्या आमिषाने कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह टॉपटेनमधील सोनेरी साखळीने गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर फ्रँचाईजी देऊन कंपनीची भरभराट केली. शिवाय स्वत:चेही कोटकल्याण करून घेतले. पुढच्या दहा पिढ्यांची मिळकत या सोनेरी टोळीने करून ठेवली आहे. वर्ष, दोन वर्षांत नव्हे तर सात, आठ वर्षांपासून शाहूपुरी येथील वातानुकूलित कार्यालयात बसून विनासायास त्याच्या मिळकतीचे रतिब सुरू आहे.

खोकी, पेट्यांमधील मिळकतीचे ‘टॉपटेन’

कागलचा बाबुराव प्रत्येक महिन्याला 3 खोक्यांचा मालक ठरतोय. पाठोपाठ शिरोलीचा भिकाजीराव सव्वा ते दीड कोटीवर आहे. मणेर मळा येथील गोल्डन मॅन दरमहा 23 पेट्या मोजून घेतोय… मुख्य अधिकारी विजय पी. (दीड खोकी), गवत मंडईतील नामदेव (25 लाख), कोल्हापुरातील आरंडे, जयसिंगपूर येथील शिरोटे ( प्रत्येकी 25 लाख), हणमंतवाडीचा सचिन ( 15 लाख), गडहिंग्लजमधील अमित, अमर ( प्रत्येकी 25 लाख), बिभिषण (15 लाख) अशी भली मोठी यादी आहे.

शिपायाची कमाल : पगार 10 हजार अन् गुंतवणूक 15 लाखांची

करवीर तालुक्यातील 20 हजार लोकवस्तीच्या नदीकाठावर खासगी फर्ममधील शिपायाची कथा… 25 वर्षीय तरुण 10 हजारात राबतोय…‘ त्या’ कंपनीतून मिळणार्‍या दामदुपटीला गडी भुलला. थेट कंपनीत गेला. माहिती घेतली. गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के परतावा… एकदाच गुंतवणूक करायची अन् महिन्याला परतावा घ्यायचा… गड्याने घरावर, शेतीवर भरमसाट कर्ज उचलले… थेट 15 लाखांची रक्कम कंपनीत गुंतविली. दर महिन्याला 45 हजारांचा घसघशीत परतावा मिळू लागला … बहाद्दराने नोकरी सोडली… दिमतीला नोकरही ठेवला. सलग पाच महिने परतावा मिळाला. ऑगस्ट 2022 पासून परतावा बंद झाला. आजवर त्याच्या शाहूपुरीतील कार्यालयात शेकडो फेर्‍या झाल्या; पण दाद ना फिर्याद. गडी आता डोके धरून बसलाय. कर्जाचे ओझे त्यात वसुलीचा तगादा… नोकरीही गेली अन् 15 लाखांची रक्कमही..!

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्लॅन

  • 2 लाख 50 हजार गुंतविल्यास : श्रीलंका टूर
  •  5 लाख गुंतविल्यास : सिंगापूर टूर
  • 7, 00,000 : 2 लोकांसाठी श्रीलंका, एकजणासाठी सिंगापूर टूर
  • 16,00,000 :  6 जणांसाठी श्रीलंका,  3 लोकांसाठी सिंगापूर टूर,  6 लाखापर्यंतची चारचाकी मोटार गिफ्ट
  •  27,00,000 : 10 जणांसाठी श्रीलंका टूर, 5 जणांसाठी सिंगापूर टूर, 10 लाखापर्यंत किमतीची चार चाकी मोटार गिफ्ट
  • 54,00,000 : 20 लोकांसाठी श्रीलंका टूर,10 जणांसाठी सिंगापूर टूर,  20 लाखापर्यंत किंमतीची चार चाकी मोटार

Back to top button