कोल्हापूरच्या विमानसेवा विस्ताराला गती मिळावी : ज्योतिरादित्य शिंदे | पुढारी

कोल्हापूरच्या विमानसेवा विस्ताराला गती मिळावी : ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : क्षमता आणि संधी सिद्ध केलेल्या कोल्हापूर विमानतळावरून आता विमानसेवा विस्ताराला गती द्यावी, अशी अपेक्षा कोल्हापूरकर करत आहेत. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे गुरुवार (दि.24) पासून दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळाबाबत ते काय घोषणा करणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे.

कोल्हापूर विमानतळाचा विकास होत आहे. 1345 मीटरवरून धावपट्टीचा 2300 मीटरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1980 मीटरचे विस्तारीकरण झाले असून त्यापैकी 1730 मीटर धावपट्टीचा वापर सुरू झाला आहे. धावपट्टी विस्तारल्याने कोल्हापुरातून सध्या उड्डाण होत असलेल्या सर्व विमानात त्यांच्या प्रवासी क्षमतेचा पूर्ण वापर करता येऊ लागला आहे. मंगळवारी 146 आसन क्षमतेच्या विमानाचे यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ झाले. यामुळे मोठी विमाने उतरण्याचा मार्ग मोकळा झाला
आहे.

बंद पडलेल्या सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा

कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर चांगली मागणी असतानाही कंपनीने ही सेवा बंद केली. कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर दिवसभरातून दोन फेर्‍या होत्या, त्यापैकी एका कंपनीने सेवा बंद केली. या दोन्ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर-मुंबई, अहमदाबाद दररोज सुरू करावी

कोल्हापूर-मुंबई या मार्गावर सध्या आठवड्यातून तीन दिवसच तर कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर चार दिवस फ्लाईट आहे. या दोन्ही मार्गांवर दररोज विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. याखेरीज मुंबईसाठी आणखी फेर्‍यांसाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे.

कार्गो सेवेलाही गती द्यावी

कोल्हापुरात कार्गो वाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे. सध्याच्या प्रवासी विमानसेवेतून कार्गो वाहतुकीला यापूर्वीच परवानगी दिली आहे, त्याला आता गती देण्याची गरज आहे. तसेच स्वतंत्र कार्गो वाहतुकीच्या द़ृष्टीनेही सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

टर्मिनस इमारत मुदतीत पूर्ण करा

टर्मिनस इमारत, एटीसी टॉवरची उभारणी सुरू आहे. याकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री शिंदे यांनीच याकरिता आता मार्च 2023 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या मुदतीतच ही इमारत पूर्ण होण्याची गरज आहे.

कोल्हापूर मेट्रो सिटीशी जोडण्याची गरज

कोल्हापूर देशभरातील मेट्रो सिटीशी हवाईमार्गे जोडण्याची गरज आहे. पर्यटन, औद्योगिक, कृषी आदी क्षेत्रांतील कोल्हापूरची क्षमता यापूर्वीच सिद्ध झाली आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही बळ देण्याची गरज आहे. ‘उडाण’ योजनेंतर्गत कोल्हापूर-शिर्डी, कोल्हापूर-गोवा, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-नाशिक आदींसह देशातील अन्य शहरांशी जोडणारे कोल्हापूरच्या मार्गांचा समावेश करण्याची गरज आहे. कोल्हापूर-चेन्नई, कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-जयपूर, कोल्हापूर-अजमेर (किशनगढ) आदी मार्गांवरही विमानसेवांची मागणी आहे, त्याबाबतही सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे.

Back to top button