कोल्हापूर : प्रभाग रचना नव्याने करा; नगरविकास विभागाचे आदेश | पुढारी

कोल्हापूर : प्रभाग रचना नव्याने करा; नगरविकास विभागाचे आदेश

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करा, असे पत्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंगळवारी पाठविले आहे. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी लागणार्‍या प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरच त्याचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली. त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. 16 नोव्हेंबरपासून महापालिकेवर डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करून आरक्षण सोडत काढण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने एक सदस्यीय 81 प्रभाग रचना करून आरक्षण निश्चित केले. फेब—ुवारी 2021 पर्यंत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यापर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रकोप वाढल्याने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिकेला आले. 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोल्हापूर शहरातील 81 प्रभागांसाठी प्रत्येकी 3 नगरसेवकांचा एक असे 27 प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडतही काढण्यात आली. परंतु, पुन्हा निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर शहरातील लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या 92 निश्चित करण्यात आली. या नव्या संख्येनुसार त्रिसदस्यीय प्रभाग रचना तयार केली गेली. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग आणि 2 नगरसेवकांचा एक असे 31 प्रभाग तयार करून त्यांच्या हद्दीही निश्चित करण्यात आल्या. ही प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्याची आरक्षण सोडतही काढण्यात आली. यासंदर्भातील अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला त्याचवेळी पाठविला आहे. इच्छुकांच्या नजरा

निवडणुकीकडे…

गेली दोन वर्षे निवडणुका नाहीत. प्रशासकराज असल्याने निर्णयावर मर्यादा येतात. शहरात जे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यावर लोकप्रतिनिधी नसल्याने अंकुश दिसून येत नाही. निवडणुका होतील, या आशेने इच्छुक तयारीला लागले आहेत. सण-उत्सवांतून ते जनतेसमोर आले. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याच्या घोषणा केल्या. मात्र, दोन वर्षे सारे काही ठप्प होते. आता निवडणुका होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बदलत्या राजकीय समीकरणानुसार आघाड्या होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बंडखोरी फोफावल्यास निवडणूक झाल्यानंतर आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी नेते मंडळी प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.

त्रिसदस्यीय की चार सदस्यीय प्रभाग रचना?

ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेसाठी नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे-फडवणवीस सरकारने नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. त्यावर राज्यातील इतर महापालिकांतील नगरसेवकांची संख्या ठरणार आहे. त्याबरोबरच यापूर्वी त्रिसदस्यीय संख्येनुसार प्रभाग रचना झाली असली, तरी आता चार सदस्यीय प्रभाग रचना होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार आहे. कोल्हापूर महापालिकेलाही हा निर्णय लागू होईल. त्यामुळे महापालिकेला पुन्हा संपूर्ण प्रभाग रचना बदलावी लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना 19 मे 2016 रोजी राज्य सरकारने बहुसदस्यीय पद्धतीसाठी आदेश काढला होता. राज्यातील सर्व महापालिकांत एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय पद्धती लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून नियमात दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, 2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आदेश 2020 मध्ये रद्द केला होता. मात्र, पुन्हा काही महिन्यांनी महाविकास आघाडी सरकारनेच बहुसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला. आता राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीनेच होत आहेत.

Back to top button