शिवाजी पूल-केर्ली रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा | पुढारी

शिवाजी पूल-केर्ली रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

कोल्हापूर, सुनील सकटे : रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र हा महामार्ग आता कोल्हापूर शहरातून वगळून केर्लीपासून शियेकडे वळविण्यात आल्याने शिवाजी पूल ते केर्ली या रस्त्याच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या केवळ सात ते आठ कि.मी. अंतराची देखभाल दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे.

रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गाच्या 134 कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. चौपदरीकरणासाठी 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले आहे. या कामाची वर्कऑर्डर निघून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. हा महामार्ग पूर्वी कोल्हापूर शहरातून जात असल्याने अगदी पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलापर्यंत रस्त्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होती. मात्र आता हा महामार्ग केर्ली येथून बायपास करून केर्ली ते शिये-चोकाक असा विस्तारित केला आहे. त्यामुळे केर्ली ते शिवाजी पूल या अंतराच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आता कोण घेणार हा प्रश्न आहे.

शिवाजी पूल केर्ली या मार्गाच्या दुरुस्तीबाबत अद्याप काहीच हालचाल दिसत नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी महापुराचे पाणी येते. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता बंद होत असतो. त्यामुळे या मार्गावर उड्डाणपुलासह रस्त्याची उंची वाढविणे हे पर्याय आहेत. मात्र आता महामार्गच वळविल्याने हे पर्याय प्रत्यक्षात अंमलात येणार का, अशी शंका येते. या रस्त्याचे रुंदीकरण त्वरित करावे, अशी मागणी होत आहे.

ठिकठिकाणी पूल बांधण्याचा प्रस्ताव : आ. पी. एन. पाटील

या मार्गावर रेडेडोहसह ठिकठिकाणी पूल बांधण्याचा प्रस्ताव महामार्ग प्रधिकरणाने केला आहे, असे आ. पी. एन. पाटील यांनी सांगितले.

Back to top button