कोल्हापूर : कोरोना काळात विमानसेवेचे उंच उड्डाण | पुढारी

कोल्हापूर : कोरोना काळात विमानसेवेचे उंच उड्डाण

कोल्हापूर ; अनिल देशमुख : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानाचा अनेक क्षेत्रांना फटका बसला. मात्र, याच कालावधीत कोल्हापूरच्या विमानसेवेने मोठी गगनभरारी घेतली. मे 2020 ते ऑगस्ट 2021 या 15 महिन्यांत तब्बल 1 लाख 6 हजार 788 नागरिकांनी विमानप्रवास केला. या कालावधीत 2 हजार 848 फ्लाईटस्ची ये-जा झाली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आतंरराष्ट्रीय उड्डाणासह देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. 26 मार्चपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा 20 मे 2020 पासून सुरू झाली. राज्यातील चार विमानतळावरील सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यात कोल्हापूरचा समावेश होता.

कोरोना काळातही कोल्हापूर विमानतळाने सर्व सूचनांचे पालन करीत, विमानसेवेला गती देण्याचा प्रयत्न केला. यामुळे कोरोना काळात 20 मे 2020 पासून सुरू झालेली विमानसेवा आजतागायत कोरोनाच्या कारणाने बंद झालेली नाही. याउलट टप्प्याटप्प्यांने सर्व मार्गावरील सेवा सुरू झाल्या. गेल्या 15 महिन्यांच्या कालावधीत दररोज प्रवाशांच्या संख्येत वाढच होत आहे. जून 2021 ते ऑगस्ट 2021 या गेेल्या तीन महिन्यांत प्रवासी संख्या 20 हजार 299 वर गेली.

आजअखेर 2 लाख 56 हजार 714 प्रवासी

डिसेंबर 2018 पासून विमानसेवा सुरू झाली. तेव्हापासून ऑगस्ट 2021 अखेर कोल्हापूर विमानतळावरील प्रवाशांची संख्या 2 लाख 56 हजारांवर गेली. या कालावधीत 6 हजार 862 फ्लाईटस्चे लँडिंग आणि टेक ऑफ झाले.

दिवसांत 482 प्रवासी

कोल्हापूर विमानतळावरून दि. 4 ऑगस्ट रोजी कोरोना काळातील दिवसभरातील सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली. या दिवशी 482 प्रवाशांची नोंद झाली.

कोरोनाबाबतच्या सर्व नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच मार्गावरील सेवा आता पूर्ववत झाल्या आहेत. प्रवासी संख्येत यापुढे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
– कमल कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ

Back to top button