कोल्हापूर : मेघोलीतील ‘त्या’ शेतजमिनीचे होणार पुनर्भरण - पुढारी

कोल्हापूर : मेघोलीतील ‘त्या’ शेतजमिनीचे होणार पुनर्भरण

कोल्हापूर ; सुनील सकटे : मेघोली तलाव फुटून नुकसान झालेल्या शेतजमिनीच्या पुनर्भरणासाठी पाटबंधारे विभाग सक्रिय झाला आहे. कोल्हापूर पाटबंधारे दक्षिण विभागाने सुमारे दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळविण्यासाठी पाटबंधारे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

एक सप्टेंबर रोजी मेघोली लघुपाटबंधारे तलाव फुटला. या दुर्घटनेत धरणाचा शंभर मीटरचा भराव वाहून गेल्याने धरणाचे मोठे नुकसान झाले. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर धरणाखालील ओढ्यासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पिकांसह संपूर्ण शेतजमीन वाहून गेली. जमिनीची माती खरडून काढल्याप्रमाणे वाहून गेल्याने शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पिकांच्या नुकसानीबाबत महसूल विभागातर्फे पंचनामे झाले असून लवकरच त्याची आकडेवारी जाहीर केली जाईल; मात्र शेत जमिनीच्या नुकसानीबाबत पाटबंधारे विभागाने गंभीर दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतजमीन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी या जमिनीच्या पुनर्भरणासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी एक कोटी 45 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. या निधीतून नाला खोलीकरण केले जाणार आहे. नाला खोलीकरणासाठी 65 लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. वाहून गेलेली शेती पूर्ववत करण्यासाठी 80 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. नाला खोलीकरणात नाल्यात वाहून आलेला गाळ काढणे, केटीवेअर बांधणे ही कामे होणार आहेत.

शेती पूर्ववत करण्यासाठी शेतीचे सपाटीकरण करून पेरणीयोग्य जमीन करण्यात येणार आहे. शेतीचे पुनर्भरण होणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

धरण पुन्हा बांधण्याच्या हालचाली

मेघोली तलावामुळे या परिसरातील ओसाड जमीन 2000 पासून बागायत बनली आहे. तलाव फुटल्याने पाण्याचा साठा होत नाही. बागायत असणारी जमीन पुन्हा ओसाड होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागातर्फे युद्धपातळीवर हे धरण पुन्हा बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Back to top button