कोल्हापूर विभागात 20 दिवसांत 37 लाख टन गाळप | पुढारी

कोल्हापूर विभागात 20 दिवसांत 37 लाख टन गाळप

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : परतीच्या पावसामुळे साखर हंगाम उशिरा सुरू झाला. पण सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने हंगाम जोरदार सुरू आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर विभागात 37 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून 36 लाख 17 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा 9.98 टक्के इतका आहे. सर्वाधिक 3 लाख 25 हजार मेट्रिक टन गाळप जवाहर हुपरी या कारखान्याने केले आहे. वारणा कारखान्याचे 1 लाख 92 हजार मेट्रिक टन गाळप असून साखर उतारा 11.26 टक्के आहे. सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून गेल्या वीस दिवसांत कोणताही अडथळा नाही. यामुळे गाळपामध्ये कोल्हापूर राज्यात आघाडीवर आहे.

गतवर्षी राज्यातील काही जिल्ह्यांत मे महिन्यापर्यंत ऊस शिल्लक होता. तो ऊस शासनाला स्वतंत्र यंत्रणा वापरून कारखान्यांना घालावा लागला. ही परिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये, यासाठी साखर आयुक्तांनी एक ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. पण ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. दहा ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घालणे सुरू केले. त्यावेळी सलग पंधरा दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे पंधरा ऑक्टोबरनंतरही कारखाने सुरू होऊ शकले नाहीत. एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू झाले.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 20 तर सांगली जिल्ह्यातील 13 असे एकूण 33 साखर कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज, उदयसिंगराव गायकवाड, बांबवडे (ता. शाहूवाडी) व फराळे (ता. राधानगरी) हे तीन कारखाने अद्यापही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांची मोठी कोंडी झाली असून शासनाने हे तीन कारखाने तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे ऊस गाळप क्षमतेत वाढ होत आहे.

साखर उत्पादन

कोल्हापूर जिल्ह्यातील 23 पैकी 20 साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांमध्ये 22 लाख 87 हजार 920 क्विंटल तर सांगली जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांमध्ये 10 लाख 38 हजार 250 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.

Back to top button