कोल्हापूर : ग्रामपंचायतींचा नागरिकांच्या जीवाशी खेळ | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायतींचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

कोल्हापूर, विकास कांबळे : टक्केवारी आणि मलईत गुंतलेले अनेक सरपंच व त्यांच्या मागे फिरणारे बहुतांशी ग्रामसेवक हे दोघे मिळून गावकर्‍यांच्या जीवाशी खेळत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी काही गावांमध्ये जलजन्य साथीचे आजार पसरत असतात.

वारंवार सूचना देऊन देखील सरपंच, ग्रामसेवक पाण्याच्या शुद्धीकरणाकडे लक्ष देत नाहीत. त्याचा फायदा जलसुरक्षक घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभारावर जिल्हा परिषद प्रशासनाने नियंत्रण न ठेवल्यास जठारवाडी, दर्‍याचे वडगाव या गावात घडलेल्या घटना गावोगावी होण्यास वेळ लागणार नाही.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून जलजन्य साथीचे उद्रेक होत आहेत. पाणी सर्वेक्षणामध्ये जिल्हा राज्यात अव्वल आहे. पण दरवर्षी जिल्ह्यात जलजन्य साथी अनेक गावांमध्ये पसरत असल्यामुळे आणि या गावांमध्ये हिरवे कार्ड असणार्‍या गावांचाही समावेश असल्यामुळे या सर्वेक्षणाबाबतच संशय निर्माण झाला आहे.

साथ पसरली की आरोग्य विभागाच्या वतीने पाण्यामध्ये टीएसएल पावडर वापराव्यात, जलसुरक्षा मार्फत आरोग्य सेवकाच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचे शुद्धीकरण करावे, पाण्याची टाकी महिन्यातून एकदा स्वच्छ करावी, गळती काढावी अशा सूचना दिल्या जातात. परंतु त्या कागदावरच राहतात. कारण सरपंच आणि ग्रामसेवकांनाच त्यामध्ये फारसा रस नसतो. त्यामुळे कर्मचार्‍यारी देखील त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
सूचना देऊनही ग्रामपंचायत स्तरावर पाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे तपासणीसाठी गेलेल्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास येते. परंतु ही घटना तत्कालिक असते. साथ गेली की सर्व लोक विसरून जातात. याचाच फायदा अनेक सरपंच आणि ग्रामसेवक घेत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

१. जिल्ह्यात ज्या पाच ते सहा गावांमध्ये साथ पसरली आहे, त्या गावाचे ग्रीन कार्ड असून देखील येथील पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे या गावांना पाणी सर्वेक्षणाचे ग्रीन कार्ड मिळालेच कसे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

२. पाण्यामध्ये टीसीएल किती टाकायचे याचे देखील प्रमाण ठरले आहे. एक हजार लिटरला 5 ग्रॅम असे प्रमाण आहे. क्लोरिनेशन केल्यानंतर किमान अर्धा तास पाणी वापरायचे नसते.

जलरक्षक करतात काय?

ग्रामीण भागातील जलजन्य साथीचे आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये जलरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. गावाला पुरवठा करण्यात येणार्‍या पाण्याची शुद्धता तपासण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. टीसीएल पावडर टाकली जाते की नाही, हे पाहणे, स्रोतांची पाहणी करणे, फिल्ड टेस्ट किडच्या सहाय्याने पाण्याची तपासणी करणे, गळतींवर लक्ष ठेवणे ही कामे जलरक्षकाने करावयाची आहेत. अशुद्ध पाणी पुरवठा होत असेल तर तत्काळ त्याबाबत ग्रामपंचायतींना कल्पना देऊन उपाययोजना आखण्याबाबत माहिती देण्याची जबाबदारी जलरक्षकावर सोपविण्यात आली आहे. परंतु तेच याकडे दुर्लक्ष करतात. साथीची तीव—ता वाढल्यानंतरच त्यांना जाग येते.

Back to top button