कोल्हापूर : शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावयाचा सासूवर हल्ला

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून फिर्याद दिल्याने संतापाचा पारा चढलेल्या जावयाने ठाणे अंमलदारासमोरच सासूवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शाहूपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे घडली. हल्ल्यात विद्या सीताराम सितम (वय 40, रा. महालक्ष्मीनगर, 5 वी गल्ली, कदमवाडी, कोल्हापूर) ही महिला जखमी झाली. संशयित सुनील परशुराम हळदे (26, कदमवाडी) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस ठाण्यात अंमलदाराच्या केबिनमध्ये सासू व जावयात राडा झाल्याने उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. महिलेच्या डोक्यात इजा झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिक्षा व्यावसायिक सुनीलचा विद्या सितम यांच्या मुलीशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. दाम्पत्याला मुलगाही आहे. कौटुंबिक कलहातून पती-पत्नीत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातून पतीकडून सतत मारहाण होत असल्याने पत्नीचे मुलासह कदमवाडी येथील माहेरी वास्तव्य आहे. रविवारी व सोमवारी पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. त्यात संशयिताने पत्नीला मारहाण केल्याने सासू सितम यांनी मंगळवारी मध्यरात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली.

सासूने आपल्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याचे समजताच जावई संतप्त झाला. त्याने थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. ठाणे अंमलदारासमोर सासू-जावई यांच्यात वादावादी, शिवीगाळ सुरू झाली. जावई महिलेच्या अंगावर धावून गेला. ड्युटीवरील कार्यरत अधिकारी, पोलिसांनी दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या जावयाने हातातील लोखंडी कड्याने महिलेच्या डोक्यावर हल्ला केला. त्यात त्या रक्तबंबाळ झाल्या. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

Back to top button