कागलमध्ये पिंपळगाव खुर्दने ग्रा.पं. निवडणुकांच्या विजयाचे महाद्वार उघडले : हसन मुश्रीफ | पुढारी

कागलमध्ये पिंपळगाव खुर्दने ग्रा.पं. निवडणुकांच्या विजयाचे महाद्वार उघडले : हसन मुश्रीफ

सिद्धनेर्ली; पुढारी वृतसेवा : मागील महिन्यात झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत पिंपळगाव खुर्दच्या (ता. कागल) ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंचाची निवड करुन राष्ट्रवादीला पाठबळ दिले. या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयाचे महाद्वार उघडले आहे, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.  पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकनियुक्त सरपंच शितल नवाळे, उपसरपंच सदाशिव चौगुले व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फिल्टर हाऊसचा पायाभरणी व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. या वेळी मुश्रीफ म्‍हणाले की, “कागलच्या श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यालगत असलेल्या या गावात दबावातून शेतकऱ्यांची वाहने बंद केली. शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबाव आणला. हे सगळं जुगारून ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या शितल अमोल नवाळे यांना सरपंच केले. या विजयामुळे माझी छाती अभिमानाने फुलली आहे.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, आमदार आणि ग्रामविकास मंत्रीपदाच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी सर्वांगीण विकास केलेला आहे. त्यामुळे पिंपळगाव खुर्दच्या रूपाने पहिलीच ग्रामपंचायत राष्ट्रवादीला मिळालेली आहे.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कामाला मिळालेला हा कौल आहे. कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यालगतचे हे गाव असतानाही इथल्या ग्रामस्थांनी दबाव आणि आमिषे झुगारून कामाला न्याय दिलेला आहे. विरोधकांनी आम्ही केलेल्या कामांचा श्रेयवाद न मांडता काम करावे.

यावेळी एम. आर. चौगुले, भिवा आकुर्डे, जे. डी. कांबळे यांचीही मनोगते झाली. व्यासपीठावर केडीसीसी बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, महेश चौगुले, रमेश तोडकर, शिवाजी घाटगे, शाहू काटकर, अशोक वठारे, अनिल पाटील, संतोष मगदूम आदी उपस्थित होते.
अशोकराव नवाळे यांनी स्वागत केले. नूतन ग्रामपंचायत सदस्य आसिफ शेख यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल भोपळे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज मोरे यांनी आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button