कोल्हापूर : पाण्याचा थेंबही देणार नाही | पुढारी

कोल्हापूर : पाण्याचा थेंबही देणार नाही

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दूधगंगा प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी स्वत:च्या जमिनी दिल्या, पुढच्या पिढीचा विचार करून हालअपेष्टा सहन केल्या. यामुळे शेतकर्‍यांच्या हक्काच्या या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, असा निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केला. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी सुळकूड योजना रद्द करा; अन्यथा कोणालाही फिरू देणार नाही, असा इशाराही दूधगंगा नदीकाठावरील ग्रामस्थांनी यावेळी दिला.

इचलकरंजी शहराला दूधगंगेतून पाणीपुरवठा करण्यासाठी सुळकूड योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, या योजनेला दूधगंगा नदीकाठावरील गावांतील नागरिकांचा तीव— विरोध आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी गावागावांत आंदोलन सुरू आहे. दूधगंगा नदीकाठावरील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबांसह विराट मोर्चा काढला. दसरा चौकातून मोर्चा व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. प्रवेशद्वारावर मोर्चेकर्‍यांनी ठाण मांडून प्रशासनाविरोधात घोषणा देत ही योजना रद्द करण्याची मागणी केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, इचलकरंजी शहराला पंचगंगा नदी जवळ असताना, दूधगंगा नदीतीलच पाणी का हवे आहे? हे पाणी या परिसरातील शेतकर्‍यांचे आहे, शेतकर्‍यांच्या या पाण्याचा एक थेंबही देणार नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, सुळकूड योजना थांबवा, असे शासनाला कळवा. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरीही योजना रेटून नेण्याचा प्रयत्न केला, तर शेतकरी अधिकार्‍यांना कोंडून घालतील.

‘गोकुळ’चे संचालक अमरिश घाटगे म्हणाले, हे शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी आहे. कागलचेच पाणी सर्वांना का दिसते? प्रशासनाने पुढच्या पिढीचा विचार करावा. शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंग घोरपडे म्हणाले, या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या आहेत, याचे भान ठेवा. दूधगंगेऐवजी कृष्णा नदीची गळती काढा, त्याचा फिल्टर प्लँट बदला, इचलकरंजीचा प्रश्न सुटेल. छत्रपती शासन संघटनेचे प्रमोद पाटील म्हणाले, पंचगंगेचे इचलकरंजी शहरच सर्वाधिक प्रदूषण करत आहे. पाणीप्रश्नी नेते राजकारण करतात आणि प्रत्येकवेळी वेळ मारून नेतात.

‘बिद्री’चे माजी संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, दूधगंगेच्या पाण्यावर कुणी तरी येऊन हक्क सांगत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. रयत शेतकरी संघटनेचे राजू पोवार म्हणाले, इचलकरंजीला पाणी मिळू नये, अशी कोणाचीच भूमिका नाही. मात्र, हे पाणी ते उद्योगाला वापरणार आहेत. त्यापेक्षा पंचगंगा स्वच्छ करून घ्या. मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, दूधगंगेतील पाणी काहीही झाले तरी देणार नाही.

शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इचलकरंजी शहरानजीक पंचगंगा असताना, ती नदी ओलांडून इतक्या लांबून, दुसर्‍या नदीतून ही योजना का? अशी आजपर्यंत कोणती योजना झालेली नाही आणि ती अव्यवहार्य असल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ही योजना झाली, तर पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष होईल आणि पंचगंगेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होईल. या योजनेमुळे बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याने महापुराचा धोका आणखी वाढणार आहे, असेही सांगण्यात आले. या योजनेस मंजूर झालेला 160 कोटी 84 लाखांचा निधी पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी वापरावा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, या योजनेला अद्याप तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. पंचगंगा जवळ असताना दूधगंगेतून ही योजना राबविण्यामागील कारणमीमांसा जीवन प्राधिकरण स्पष्ट करेल, ती योग्य नसेल तर या योजनेला मंजुरी मिळणारच नाही. ती जर योग्य असेल, तर मात्र योजनेला मंजुरी दिली जाईल. प्रत्येक प्रकल्प होताना, त्यातील पाण्याचा हिशेब करण्यात आलेला असतो, त्यानुसार कोणत्या गावाला किती पाणी हे निश्चितच असते. त्याखेरीज जे अतिरिक्त पाणी असते, ते पाणी नंतर अशा योजनांना दिले जाते. या योजनेमुळे दूधगंगा नदीकाठावरील लोकांना त्यांच्या हक्काचे पाणी कमी होणार नाही, कर्नाटकसाठीही पाणी राखीव आहे, त्याची काळजी करू नका, असे आवाहनही रेखावार यांनी केले.

यावेळी धनराज घाटगे, सचिन घोरपडे, कृष्णात पाटील, कैलाससिंह जाधव, राजेंद्र माने, विक्रमसिंह माने, अविनाश मगदूम, अमोश शिवई, युवराज पाटील, बाबासाहेब मगदूम, बापूसाहेब पाटील, आप्पासाहेब चौगुले, स्वातंत्र्यसैनिक कलगोंडा पाटील, बाबुराव हसुरे यांच्यासह दूधगंगा नदीकाठावरील भुदरगड, कागल आणि शिरोळ तालुक्यांतील प्रत्येक गावातील नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.

Back to top button