कोल्हापूर : ग्रा.पं. निवडणुकीत विधानसभेची पेरणी! | पुढारी

कोल्हापूर : ग्रा.पं. निवडणुकीत विधानसभेची पेरणी!

कोल्हापूर, विकास कांबळे : गावच्या तिजोरीची चावी आपल्याकडे ठेवण्यासाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते. परंतु आता राज्यात सत्ता आल्यामुळे भाजपला चांगलेच बळ मिळाले आहे. त्यातच जिल्ह्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार, खासदारांची साथ त्यांना मिळणार आहे. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असल्या तरी यातून आजी-माजी आमदार विधानसभेची पेरणी करीत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाबरोबरच गटातटाचे राजकारण आणि भाऊबंदकी जोरात असते. जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही कारभार्‍यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे भाजपला मदत होणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाला आपले अस्तित्व दाखविण्यासाठी झुंजावे लागणार आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षाचे नेते पाहात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका अत्यंत चुरशीने होण्याची शक्यता आहे.

हातकणंगलेत सर्वच पक्षांची कसोटी

हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या तालुक्यात काँग्रेस, शिवसेना, भाजप या तीनही पक्षांची ताकद चांगली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचेही काही गावांमध्ये वर्चस्व आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. परंतु त्याला अलीकडील काळात तीनवेळा सुरुंग लागला आहे. एकदा जनसुराज्य शक्ती पक्षाने व दोन वेळा शिवसेनेने येथून बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळविला.

चंदगडमध्ये राष्ट्रवादीला कोण देणार शह?

चंदगड तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या तालुक्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. येथे गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालते. आ. हसन मुश्रीफ, आ. राजेश पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, गोपाळराव पाटील यांचे गट तालुक्यात आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व गट एकत्रित निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

गगनबावडा तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहणार ?

गगनबावडा तालुक्यातील 21 ग्रामपंचायती होत असून या तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढती काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी होण्याची शक्यता आहे. पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची ताकद आहे. असे असले तरी या तालुक्यातील निवडी गटातटावरच होण्याची शक्यता आहे. या तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. शाहूवाडी तालुक्यात आ. कोरे गट, माजी आ. सत्यजित पाटील-सरुडकर गट, गायकवाड गट हे प्रमुख गट आहेत. सोयीनुसार या तालुक्यात आघाड्या होत असतात. त्यामुळे प्रत्येक गावातील चित्र वेगळे पाहावयास मिळते. या तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

राधानगरी, भुदरगडमध्ये राष्ट्रवादी अन् शिंदे गटाचा लागणार कस

राधानगरी (66) व भुदरगड (44) या दोन तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा कस लागणार आहे. या दोन तालुक्यांतील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, आ. प्रकाश आबिटकर हे महत्त्वाचे गट आहेत. याशिवाय आ. सतेज पाटील, बजरंग देसाई, अरुण डोंगळे, विजयसिंह मोरे, विठ्ठलराव खोराटे, सदाशिव चरापले, कलिकते गटाची कमी-अधिक प्रमाणात या दोन तालुक्यांत ताकद आहे. ए. वाय. पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरात तयारी केली होती. पण प्रवेश झाला नाही. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते नेमके कोणाच्या बाजूचे हे स्पष्ट होणार आहे.

आजरा तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपत टक्कर

आजरा तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. रेडेकर, चराटी गट प्रभावी आहेत. या तालुक्यात भाजपची देखील ताकद आहे. या तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका स्थानिक पातळीवरील आघाड्यांमध्येच होण्याची शक्यता आहे.

शिरोळमध्ये स्वाभिमानी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह यड्रावकर गट भिडणार

शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि भाजपसह एकनाथ शिंदे गट अशा सर्वच पक्षांची ताकद कमी-अधिक प्रमाणात आहे. या तालुक्याचे आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटात गेले आहेत. परंतु गटातटाच्या राजकारणामुळे या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक आघाड्यांमध्येच होण्याची शक्यता आहे.

कागलमध्ये पक्षांपेक्षा गटातटातच लढतीचे संकेत

कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व आहे. मुश्रीफ यांच्यासह समरजितसिंह घाटगे गट, मंडलिक गट आणि संजयसिंह घाटगे गट या गटाभोवती तालुक्यातील राजकारण फिरताना दिसते. विधानसभेची निवडणूक झाली की, कागल तालुका पुढील निवडणूक येईपर्यंत शांत असायचा. परंतु विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे मुश्रीफांना शह देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील नवीन राजकीय समीकरणे पाहता आ. मुश्रीफ यांना कागलमध्ये भाजप व शिंदे गटाशी झुंज द्यावी लागणार आहे.

करवीरमध्ये काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेना, भाजप हादरा देणार का ?

करवीर तालुक्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. या तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. करवीरमध्ये जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील गट मोठा आहे. शिवसेनेचीही ताकद चांगली आहे. शिवसेनेचे माजी आ. चंद्रदीप नरके यांनी दोनवेळा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु सध्या जुन्या शिवसेनेतच राहावे की नव्या शिवसेनेत जावे याबद्दल त्यांची संभ—मावस्था आहे. असे असले तरी त्यांचा कल हा शिंदे गटाकडेच अधिक असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जाते. भाजपचा महडिक गटही या तालुक्यात जोरात आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीसाठी चाचपणी

जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. काही तालुक्यात काँग्रेसचे तर काही तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत व हातकणंगलेतील काही गावांमध्ये जनसुराज्य शक्तीचा प्रभाव आहे. शिवसेनेचे दोन खासदार व दोन आमदार शिंदे गटात गेले असले तरी ते निवडून येताना वेगळी समीकरणे होती. आता तीच समीकरणे राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी विधानसभेला शिंदे गटाला देखील आपण कोठे आहोत, याची चाचपणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने करता येणार आहे.

गडहिंग्लजला राष्ट्रवादीबरोबरच जनता दल, भाजपची परीक्षा!

कागल विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी या तालुक्यातही आपले वर्चस्व निर्माण केले आहे. जनता दलाचे श्रीपतराव शिंदे गटाचीही ताकद येथे आहे. या तालुक्यात भाजपचेही कार्यकर्ते सक्रिय आहेत. या तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

Back to top button