कोल्‍हापूर : 'गोडसाखर'साठी सकाळी संथ गतीने मतदान | पुढारी

कोल्‍हापूर : 'गोडसाखर'साठी सकाळी संथ गतीने मतदान

गडहिंग्लज ; पुढारी वृत्तसेवा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (रविवार) सकाळी आठ वाजल्‍यापासून मतदानाला प्रारंभ झाला. गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील ७४ केंद्रांवर मतदान होत आहे. उत्पादक गटातील २४ हजार ८५१ उत्पादक, तर २४० संस्था गटातील सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे यंदा राष्ट्रवादीचीच दोन पॅनेल आमने-सामने ठाकली असून, माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ विरुद्ध चंदगडचे आ. राजेश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आज सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. उत्पादक गटासाठी पाच, राखीव गटाचे चार व संस्था गटासाठी एक अशा दहा मतपत्रिका आहेत. संस्था गटासाठी सोमनाथ अप्पी पाटील यांनी एकगठ्ठा मतदान आणून या गटावर आपले वर्चस्व असणार हे सकाळी सिद्ध करुन दाखविले आहे. सकाळच्या टप्प्यात मतदानाला फारसा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी आठ ते दहा या दोन तासात केवळ १५.४१ टक्के मतदान झाले होते.

बहुतांश केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. दोन्ही आघाड्यांकडून मतदार आणण्यासाठी चांगलीच चुरस लागली होती. दुचाकी, चारचाकी, रिक्षा यातून मतदारांना केंद्रापर्यंत आणले जात होते. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

गोडसाखरसाठी आ. हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छ. शाहू शेतकरी समविचारी आघाडीविरोधात आ. राजेश पाटील, माजी आ. श्रीपतराव शिंदे, कामगार नेते शिवाजी खोत यांची श्री काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी रिंगणात आहे. राष्ट्रवादीच्याच दोन आमदारांमध्ये ही लढत होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :   

Back to top button