...तरच मराठी रंगभूमीला मिळेल ऊर्जा! | पुढारी

...तरच मराठी रंगभूमीला मिळेल ऊर्जा!

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच… लाल मखमली पडदा… संगीताचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग… तिसरी घंटा… हे वातावरण डोळ्यासमोर येताच कोणत्याही रंगकर्मींच्या अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. आज सोशल मीडियामुळे मराठी रंगभूमीकडे दमदार कलाकार व प्रेक्षकांचा ओढा कमी झाला आहे. दमदार संहितेला आपल्या कसदार अभिनयाने न्याय देणारी कलाकार मंडळी व या सर्वांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार्‍या नाट्य निर्मिती संस्था तयार झाल्या तरच मराठी रंगभूमीला पुन्हा एकदा ऊर्जा मिळणार आहे.

1843 मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 रोजी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. तोच आजचा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा होत आहे.

याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. या संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर हे होते. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.

1843 साली सीता स्वयंवर या नाटकाच्या रूपात सुरू झालेला हा प्रवास अलीकडच्या संगीत देवबाभळी अनन्या, अलबत्या गलबत्यापर्यंत दिवसागणिक आणखीनच प्रगल्भ होत चालला आहे. मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणार्‍या प्रत्येक रंगकर्मीसाठी 5 नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.

मराठी रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. काही बड्या कंपन्यांच्या पुढाकाराने अनेक नवीन मराठी नाटके तसेच जुन्या नाटकाचे रिमेक गाजत आहेत. मराठी नाटकाची परंपरा वृद्धिंगत होत चालली आहे. सद्य:स्थितीत व्यावसायिक पातळीवर आघाडीचे अभिनेते भरत जाधव, प्रशांत दामले, वैभव मांगले, निर्मिती सावंत हे कलाकार यशस्वी होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका क्लिकवर नाटके उपलब्ध होत असताना मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांना आणण्याची किमया हे कलाकार व दिग्दर्शक करत आहेत. कारण मराठी चित्रपटांपेक्षा मराठी मालिकांकडे कलाकारांचा कल वाढत आहे. नाटकांमध्ये काम करण्यापेक्षा रोज मालिकांमध्ये झळकण्याला अधिक पसंती दिली जात आहे. चांगल्या नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच आहे. पण चांगल्या संहिता, दमदार प्रॉडक्शन हाऊस नाट्य क्षेत्रात उतरली तर मराठी नाटकांना ऊर्जितावास्था मिळण्यास मदत होणार आहे.

Back to top button