तस्करी टोळ्यांचा ‘सीमाभागां’वर कब्जा : गुटखा, दारू, ड्रग्‍ज तस्‍करीतून कोट्यवधींचा धंदा : तरूणाई व्यसनांच्या विळख्यात | पुढारी

तस्करी टोळ्यांचा ‘सीमाभागां’वर कब्जा : गुटखा, दारू, ड्रग्‍ज तस्‍करीतून कोट्यवधींचा धंदा : तरूणाई व्यसनांच्या विळख्यात

कोल्हापूर, दिलीप भिसे : कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील नामचीन तस्करी टोळ्यांनी आर्थिक कमाईसाठी सीमाभागांवर कब्जा केला आहे. गुटखा, बनावट दारू, ड्रग्ज तस्करीतून टोळ्यांचा कोट्यवधींचा धंदा सुरू आहे. जीवघेणे ड्रग्ज आणि मृत्यूला निमंत्रण देणार्‍या विषारी केमिकलमिश्रित गुटख्यांमुळे मिसरूड न फुटलेली कोवळी पोरंही व्यसनाच्या विळख्यात सापडू लागली आहेत. कर्नाटक व गोव्यातील तस्करीमुळे मध्यान्ह रात्रीनंतर पुणे-बंगळूर महामार्ग सराईत टोळ्यांच्या सावटाखाली असतो.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध प्रश्नांबाबत शुक्रवारी (दि.4) कोल्हापुरात आंतरराज्य समन्वय बैठक होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेलहोत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा (विजापूर), कलबुर्गी (गुलबर्गा), बिदर जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कर्नाटकातील नामचीन टोळ्यांची सीमाभागात दहशत

सीमाभागात भेडसावणार्‍या विविध समस्यांसह कायदा- सुव्यवस्था, तस्करी टोळ्यांचे फोफावलेले साम—ाज्य, वाढती गुन्हेगारी, दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने कष्टकर्‍यांसह गोरगरिबांची होणारी फसवणूक, गुन्हेगारांची देवाण-घेवाण यावर बैठकीत व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. नामचीन तस्करी टोळ्यांची सीमाभागातील दहशत हा सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे. या विषयांवरही बैठकीत ऊहापोह होण्याची अपेक्षा आहे.

तस्करी टोळ्यांचा कर्नाटकातील शॉर्टकट मार्ग… !

गुटखा, सुंगधी सुपारीसह अमली पदार्थांवर बंदी असतानाही सीमाभागात आंतरराज्य तस्करी टोळ्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कर्नाटकातील तस्करी टोळ्यांच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत रोज कोट्यवधींच्या उलाढाली होत आहेत. सीमाभागात रात्रंदिवस पथके कार्यरत (?) असतानाही पश्चिम महाराष्ट्रात गुटखा येतोच कोठून? हा चर्चेचा विषय आहे.

या मार्गांवरून रात्रंदिवस तस्करी..!

शिरदवाड-माणकापूर, शिवनाकवाडी-बोरगाव, अब्दुललाट-बोरगाव माळ, घोसरवाड-सदलगा, पाचवा मैल-बोरगाव, दत्तवाड-सदलगा, दत्तवाड- मलिकवाड, दानवाड-एकसंबा, राजापूर-जुगूळ, आलास-मंगावती, गणेशवाडी-कागवाड या मार्गांवरून गुटखा, अमली पदार्थांसह गोवा बनावटीच्या दारूची रात्रंदिवस तस्करी सुरू असते. कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजीसह शहापूर, वडगाव ही तस्करीतील उलाढालीची प्रमुख केंद्रे बनली आहेत.पडद्याआडच्या उलाढालींमुळे तस्करीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आश्रय मिळत आहे. काळ्या धंद्यांतून मिळणार्‍या मिळकतीतून म्होरक्यांसह साखळीची दहशतही वाढू लागली आहे.

सीमाभागात बिनबोभाट तस्करी

पुणे-बंगळूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क तसेच कोल्हापूर पोलिसांनी 2018 ते सप्टेंबर 2022 या काळात तस्करी टोळ्यांच्या प्रमुखांसह साडेचारशेवर माफियांना बेड्या ठोकून कोट्यवधीचे ड्रग्ज, गोवा बनावटीची दारू, गुटख्यांचे साठे हस्तगत केले आहेत.

दोन कोटींचा भेसळ दारूसाठा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कर्नाटकमार्गे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारू तस्करीविरुद्ध कारवाई करून तस्करांचे कंबरडे मोडून काढले आहे. 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या काळात 63 ठिकाणी छापे टाकून 2 कोटी 5 लाख 45 हजारांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला. 74 दारू तस्करांना बेड्या ठोकून 31 वाहनेही धक्क्याला लावली आहेत.

कर्नाटकातील टोळ्यांची ‘होम डिलिवरी’

तस्करीतील कमाईला सोकावलेल्या सीमाभागातील अनेक गुन्हेगारी टोळ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह पुण्यातही कार्यरत झाल्या आहेत. संचारबंदीच्या काळात सारे जनजीवन ठप्प झालेले असतानाही टोळ्यांचा गोरखधंदा सुरूच होता. गुटखा, अमली पदार्थांसह गोवा बनावट दारूची खुलेआम तस्करी सुरूच होती. आता तर काळ्याधंद्यांतील उलाढाली बेधडक सुरू आहेत.

कोवळी पोरंही व्यसनांच्या विळख्यात

गुटखा, अमली तस्करीतून कोट्यवधींच्या उलाढाली करणार्‍या कर्नाटकातील सराईत टोळीतील साखळीची ‘घरपोच’ सेवाही सुरू झाली आहे. कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, जयसिंगपूर, शहापूर, इचलकरंजी, वडगाव, गडहिंग्लज, आजरा, चंदगड परिसरातील ओठांवर मिसरूडही न फुटलेली कोवळी पोरंही जीवघेण्या व्यसनांची शिकार ठरू लागली आहेत.

Back to top button