कोल्‍हापूर : ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर चालकांना प्रशासनाने शिस्‍त लावण्याची गरज | पुढारी

कोल्‍हापूर : ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर चालकांना प्रशासनाने शिस्‍त लावण्याची गरज

कुरुंदवाड ; जमीर पठाण : कर्णकर्कश आवाजातील गाणी, वाहत्या ट्रॉलीतून पडणारे ऊस, रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॉली आणि ओव्हरलोड वजनासह भरधाव गती अशा अवस्थेतून ऊस वाहतूक करणाऱ्यांकडून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. वाहतूक पोलीस प्रशासनासह साखर कारखाना प्रशासनाने अशा बेदरकार वाहनधारकांना शिस्त लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सध्या सगळीकडेच ऊसतोड हंगाम सुरू आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह कर्नाटक राज्यातील वीसहून अधिक कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांसाठी अहोरात्र ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर धावत असतात. पण या ट्रॅक्टर- ट्रॉलींना मागील बाजूस रिप्लेक्टर नाहीत. तसेच कानठळ्या बसवणाऱ्या कर्णकर्कश आवाजातून गाणी लावलेली असतात. वाहन चालकाच्या बाजूला विविध प्रकारचे रंगीत गोंडे अडकविलेले असतात, वाऱ्यामुळे ते बाजूला हलत असल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी अथवा इतर वाहनधारकांना ओव्हरटेक करा असे चालक सांगत असल्याचा भास या गोंड्यांमुळे होतो.

तसेच भरधाव वेग असल्यामुळे या ट्रॅक्टरमधून मोळी-मोळीने ऊस रस्त्यावर पडतात. बऱ्याचदा ओव्हरलोड भरल्यामुळे बाजूचा लाकडी मोका मोडून ट्रॉलीतील ऊस एका बाजूला झुकला जातो. अनेकदा अशामुळे ऊस ट्रॉली उलटली जाते आणि त्याखाली बाजूला जाणारे वाहनधारक, जनावरे चिरडली जाण्याची शक्यता असते.

काही कारखान्यांची ऊस वाहतूक ही बैलगाडीसारख्या असलेल्या ट्रॉलीला ट्रॅक्टर जोडून वाहतूक केली जाते. मात्र या वाहतुकीतून ही मोठ्या प्रमाणात उसाची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल रस्त्यावर पडून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांतून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. त्‍यामुळे कारखानदारांबरोबरच पोलीस प्रशासनाने ट्रॅक्‍टर चालकांवर जरब बसवावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button