‘बिद्री’चा जिल्ह्यात उच्चांकी टनामागे 3,209 रुपये दर | पुढारी

‘बिद्री’चा जिल्ह्यात उच्चांकी टनामागे 3,209 रुपये दर

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना यावर्षी उसाला प्रतिटन 3 हजार 209 रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील हा उच्चांकी दर असून, यंदाही ऊस दराची परंपरा ‘बिद्री’ने कायम राखल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या महागाईबरोबरच रासायनिक खते, औषधे यांचे दर वाढत असल्याने साखरेचा हमीभाव वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याने खर्चात काटकसर करून जादा ऊस दर देण्याची भूमिका कायम ठेवल्याचे पाटील म्हणाले.

आधुनिकीकरणानंतर प्रतिदिन 8 हजार मे. टन क्षमतेने ऊस गाळपासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज आहे. यंदा 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, चिफ अकाऊंटंट एस. ए. कुलकर्णी, शेती अधिकारी बी. एन. पाटील यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

‘बिद्री’ने राखला ‘लै भारी’चा बाणा!

‘बिद्री’ने नेहमीच जिल्ह्यात उच्चांकी, तर काहीवेळा राज्यात सर्वात जास्त ऊस दराची परंपरा राखली आहे. यंदाही दराची परंपरा कायम राखत आतापर्यंत जाहीर झालेल्या कारखान्यांपैकी ऊस दरात बिद्री अव्वल आहे. उच्चांकी दर जाहीर करून ‘बिद्री’ने ‘लै भारी’चा बाणा कायम राखला आहे. गाळप हंगाम वर्ष व कंसात दिलेला दर असा : 2016-17 (टनास 3,001 रुपये), 2017-18 (3,101 रुपये), 2019-20 (3,012 रुपये), 2020-21 (3,116 रुपये) व 2022-23 (3,209 रुपये).

Back to top button