कोल्हापूर : विहिरीत बुडणार्‍या बालकाला मुलीने वाचविले | पुढारी

कोल्हापूर : विहिरीत बुडणार्‍या बालकाला मुलीने वाचविले

दानोळी,  मनोजकुमार शिंदे : सायंकाळी पाचची वेळ, भारत- पाकिस्तान मॅच रंगात आली होती. भारत जिंकणार या आवेशात सगळे कुटुंब उत्साहात होते. दरम्यान, पाच वर्षांचा ओजस किंचाळला शौर्य विलीत बुडाला, शौर्य विलीत बुडाला…ऐकणार्‍यांच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणाचाही विचार न करता 15 वर्षांच्या नम्रताने विहिरीत उडी घेतली आणि क्षणार्धात शौर्यला घेऊन काठावर आली. अन् पाहणार्‍यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला दानोळी-जयसिंगपूर रोडलगतच्या कटारे मळ्यातील ओजस (वय 5) आणि शौर्य जयकुमार कटारे (वय 3) दोघे भाऊ अंगणात खेळत होते. जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे घरासमोरची विहीर ही काटोकाट भरलेली. खेळत-खेळत शौर्य विहिरीच्या काठावर गेला. सोबत ओजसही होता. घरातील सगळेच भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यात गुंग होते.

अचानक शौर्य विहिरीत बुडाला. पाच वर्षांचा ओजस आपल्या बोबड्या आवाजात किंचाळला शौर्य विलीत बुडाला, शौर्य विलीत बुडाला..! काहीजणांना काहीच समजले नाही, ज्यांना समजले त्यांच्या जणू हृदयाचा ठोका चुकला होता. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य शौर्यची नववीत शिकणारी 15 वर्षांची आत्या नम्रता कलगोंडा कटारे हिच्या लक्षात आले. आपल्या भावाचा तीन वर्षांचा मुलगा विहिरीत बुडाला आहे. क्षणाचाही विचार न करता नम्रताने विहिरीत उडी घेतली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोवर शौर्यला घेऊन ती विहिरीबाहेर आली आणी सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला. या घटनेने ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अशी चर्चा सुरू झाली आहे. दानोळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रेया वांजुळे, अध्यक्ष राजकुमार पाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे व परिसरातील ग्रामस्थांनी भेटून नम्रताचे कौतुक केले.

Back to top button