कोल्हापूर : दिवाळीनिमित्त जिल्ह्यात दीड हजार कोटींची उलाढाल | पुढारी

कोल्हापूर : दिवाळीनिमित्त जिल्ह्यात दीड हजार कोटींची उलाढाल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणानिमित्त कोल्हापूरची बाजारपेठ पुन्हा बहरली, विविध सवलतींमुळे ग्राहकांनी खरदीचा आनंद लुटला. यामुळे अंदाजे एक ते दीड हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोने व वाहन खरेदीत 20 टक्के वाढ झाली आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक तसेच कापड, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल खरेदीला ग्राहकांकडून अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याने व्यापारीवर्गाची खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी झाली. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी झाल्याने ग्राहकांनीही मुक्तपणे खरेदीचा आनंद लुटला. यंदा पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आल्याने बाजारपेठेत या दिवशी मोठी उलाढाल झाली. कारण, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नव्हते. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलून गेली.

बुधवारी सकाळपासूनच ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी दिसू लागली. यंदा दुचाकी व चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स व वाहन खरेदीला ग्राहक प्राधान्य देताना दिसत होते. या वाहनांचे अगोदरच बुकिंग केल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे स्वप्न साकारले गेले. पेट्रोल-डिझेलवरील दुचाकी, चारचाकी वाहनांना ग्राहकांची पसंती कायम होती. अनेक अडचणींचा सामना करणार्‍या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी दिवाळी पाडवा सण सकारात्मक राहिला. कोल्हापूर जिल्ह्यातून विविध कंपन्यांच्या एक हजार वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज साई सर्व्हिसचे सुधर्म वाझे यांनी सांगितले. तर काही वाहनांना वेटिंग असल्याने ती वेळेत मिळाली नाहीत, त्यामुळे ग्राहकही नाराज झाले होते.
दुचाकी वाहनांना यंदा चांगली मागणी होती. बुलेट, स्पोर्टस् बाईकला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात होते. जिल्ह्यात ई-बाईक व दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर अशा पाच हजारहून अधिक वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे.

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिनला मागणी

जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेतही तेजी पाहायला मिळाली. होम अप्लायन्सेस, वॉशिंग मशिन्सची मोठी खरेदी करण्यात आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी शून्य टक्के व्याजदर, ई-कॉमर्सवरील दरामध्ये वस्तूंच्या विक्रीसह अन्य विविध योजना उपलब्ध करून दिल्या होत्या. सकाळपासून सायंकाळपर्यंत इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती, असे राजा काका मॉलचे दीपक केसवानी यांनी सांगितले.

सोने खरेदीत 20 टक्के वाढ

दिवाळी पाडवा सणाचे औचित्य साधून पाडव्यानिमित्त सराफ बाजारपेठेत सोने, चांदी खरेदीत 20 टक्के वाढ झाली असून , कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. सोन्याचे दर काहीसे स्थिर आहेत. भविष्यात हे दर वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले. चोख सोने, सोन्याची नाणी, अंगठी, कर्णफुले, बाली, नेकलेस, बांगड्या, पाटल्या यांना मागणी होती. ग्राहकांच्या मागणीनुसार कमी वजनाच्या नक्षीदार व आकर्षक कलाकुसर असणार्‍या दागिन्यांना मागणी होती. 18 कॅरेटमध्ये डायमंडपासून तयार करण्यात आलेल्या आभूषणांना मागणी होती. पर्यटकांची संख्या वाढल्याने सराफ बाजारपेठेत तेजी दिसून आली, असे महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांनी सांगितले.

स्मार्ट फोनची मागणी वाढली

5-जी सेवा देणार्‍या नवीन स्मार्ट फोनला यावेळी मागणी होती. याशिवाय स्मार्ट वॉच, लॅपटॉप, मोबाईल अ‍ॅक्सेसरीज खरेदीलाही ग्राहक प्राधान्य देताना दिसत होते. आयफोन, पॉवर बँक, स्पीकर्स, ब्लू टूथ कॉलिंग स्मार्ट सन ग्लासेस हे यंदाच्या दिवाळीतील ग्राहकांचे खास आकर्षण ठरले, असे एस. एस. कम्युनिकेशनचे संचालक सिद्धार्थ शहा यांनी सांगितले.

दिवाळी पाडव्यानिमित्त जिल्ह्यात झालेली वाहनांची विक्री याप्रमाणे

दुचाकी वाहने : 3 हजार 674
चारचाकी वाहने : 986
मालवाहतूक वाहने : 200
ट्रॅक्टर : 107
मोपेड : 69
अन्य वाहने : 137

अपेक्षित उलाढाल

दसरा सणाला जसा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद दिवाळी पाडव्याला मिळाला. यंदा सर्वच क्षेत्रांत अपेक्षित उलाढाल झाली. कर्मचारी व कामगारांना बोनस मिळाला. हातात पैसा आल्याने व फायनान्स कंपन्यांच्या विविध योजनांमुळे बाजारपेठेत अपेक्षित उलाढाल झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात अंदाजे एक ते दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

वस्त्रनगरीत उलाढाल 400 कोटींवर..!

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत वस्त्रनगरीत सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने आदींची मोठी उलाढाल झाली. ग्राहकांच्या खरेदीची ओढ पाहून विक्रेत्यांनी आकर्षक ऑफर्स दिल्या होत्या. त्याचाही फायदा ग्राहकांनी घेतला. त्यामुळे वस्त्रनगरीत 400 कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दोन वर्षांनंतर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीपूर्वी कामगारांना बोनसची रक्कम मिळाल्यामुळे खरेदीला उत्साह आला होता. विशेषत: रेडिमेड कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल होता. त्यामुळे कपड्यांची दुकाने रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलली होती.

पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करण्याकडेही विशेष कल दिसून आला. त्यामुळे वाहनांच्या शोरूममध्येही नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे वाहन खरेदीत कोट्यवधींची उलाढाल झाली. वाहन खरेदीबरोबरच सोने खरेदीलाही ग्राहकांनी पसंती दिली. त्यामुळे शहरातील सुवर्ण पेढ्यांमध्येही गर्दी दिसत होती. सोने-चांदी खरेदीचीही मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने झाली. जागा, फ्लॅट खरेदीसाठीही नागरिकांचा विशेष उत्साह दिसून आला. विविध आकर्षक स्कीम पाहून नागरिकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली.
सध्या मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे साहजिकच नवीन मोबाईल खरेदीकडेही नागरिकांचा कल होता. नवीन मोबाईलची फीचर्स पाहून खरेदी केली जात होती. त्यामुळे मोबाईलची दुकानेही गर्दीने गजबजून गेली होती.

यावर्षी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्यामुळे उत्साहाला आणखीनच उधाण आले होते. भाऊबीजनिमित्त अनेक ठिकाणी बहिणीला आकर्षक गिफ्ट देण्यासाठीही विविध वस्तूंची खरेदी झाली.

Back to top button