राष्ट्रवादी सोडण्यावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील गटाचे शिक्कामोर्तब | पुढारी

राष्ट्रवादी सोडण्यावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील गटाचे शिक्कामोर्तब

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीच पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. हसन मुश्रीफ यांनी केलेली विनंतीही त्यांनी धुडकावली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीकडे नेत्यांचे दुर्लक्ष पक्षाला भोवले आहे. पाटील आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून, तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

शनिवारी सोळांकूर येथे ए. वाय. पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. रविवारी (दि.23) सकाळी 11 वाजता तालुक्यातील गावागावांतील ए. वाय. पाटील समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून भविष्यातील लढाईसाठी हातात ढाल-तलवार घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

तुम्हाला खूप उशीर झाला, मी आता फार पुढे गेलो आहे…

दरम्यान, सोळांकूरमधील बैठकीतील निर्णयाची कुणकुण लागताच दुपारी आ. हसन मुश्रीफ यांनी ए. वाय. पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती केली. मात्र, आता उशीर झाला असून मी फार पुढे गेलो आहे, माझा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला आहे, असे ए. वाय. पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

दुसर्‍या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीला रामराम

ए. वाय. पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यास राधानगरी तालुक्यात घड्याळाची टिक्टिक् मंदावणार असून, ढाल-तलवारीचा खणखणाट वाढणार आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्याग करणारे ए.वाय. हे दुसरे जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. यापूर्वी लेमनराव निकम यांनीही 2009 मध्ये के. पी. पाटील यांची साथ सोडत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रकाश आबिटकर यांना साथ दिली होती. यावेळीही तशीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत आहेत.

दै. ‘पुढारी’त सर्वप्रथम वृत्त

ए. वाय. पाटील मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्याचे आणि ते राष्ट्रवादी सोडून ढाल-तलवार हातात घेणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम दै. ‘पुढारी’मध्ये 14 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. ते अचूक ठरत आहे. याच आठवड्यात खा. संजय मंडलिक, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुंबईत ना. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ए. वाय. पाटील यांची दुसर्‍यांदा भेट घडवून आणल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत आ. आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांनी एकत्रित काम करावे. पाटील यांचा राज्यपातळीवर योग्य तो सन्मान केला जाईल. तसेच बिद्री साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत के.पीं.च्या विरोधात बिद्री कार्यक्षेत्रातील सर्व गटा-तटांची मोट बांधून त्याचे नेतृत्व ए. वाय. पाटील यांच्याकडे सोपविण्यात येईल, असेही ठरल्याचे सांगण्यात येते.

राजकारणाचे संदर्भ बदलणार

ए. वाय. पाटील यांच्या निर्णयामुळे बिद्री, भोगावती व राधानगरी तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संदर्भही बदलणार असून, नजीकच्या काळात जिल्हा बँक आणि गोकुळमध्येही ते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Back to top button