कोल्हापूर : नेमकं माझं घर आहे तरी कोणतं? ... ही शोकांकिका थांबणार कधी? | पुढारी

कोल्हापूर : नेमकं माझं घर आहे तरी कोणतं? ... ही शोकांकिका थांबणार कधी?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जन्मली तेव्हा वडिलाचं घर….लग्न झाल्यावर नवर्‍याचं घर…. आणि आता उतारवयात मुलाचं घर आहे. या तिघांची मर्जी सांभाळली म्हणून ती घरात होती नाहीतर जन्मापासून बेघरच. आता ती विचार करतेय माझं घर नेमके कोणते होते …आणि आज मी रस्त्यावर का ?

दिवाळीच्या तोंडावर महाव्दार रोडवर सणानिमित्त खरेदीसाठी गर्दी होत असताना त्या गर्दीत चेहर्‍यांवरील सुरकत्यांमध्ये खचलेल्या एका आजीचा चेहरा उठून दिसत होता. वरवर पाहताना ती तशी चांगल्या घरातील वाटली, अधिक चौकशी करता मुले चांगल्या हुद्यावर काम करत असल्याची माहिती मिळाली. आजुबाजूच्या लोकांनी आजींकडून मुलांचा फोन नंबर घेवून त्याच्याशी संपर्क साधला. तर एका सूनेने दुसर्‍या मुलाला फोन करा असे सांगितले तर मुलींने मी सासरी आहे, त्यामुळे आईची जबाबदारी भावांची असल्याचे सांगून आपले हात झटकले.

आजीनेही मुलांना आपण नकोसे आहोत तर मला वृध्दाश्रमात दाखल करा असे उपस्थितांना सांगितले. पण या आजीसारख्या अनेक उतारवयातील महिला रस्त्यावर दिसतात. हे थांबायला हवे , याच सामाजिक भावनेतून काही लोकांनी आजीला घेवून थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना आजीच्या अवस्थेबाबतची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी पुन्हा तिच्या मुलांशी संपर्क साधला आणि मुलांना आईला घरी घेवून जाण्याची विनवणी केली.

मात्र आधीप्रमाणेच मुलांनी त्याला नकार दर्शवला. अशावेळी पोलिसांनी आपल्या खास शैलीत कायद्याची भाषा करताच एका तासाच्या आत आजीची सर्व मुले पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. तिच्या चांगल्या प्रकारे सांभाळ करण्यासोबत तिला पुन्हा अंतर देणार नसल्याचेही त्यांनी कबूल केले. आजी आज आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करतेय.

ही शोकांकिका थांबणार कधी?

या आजीसारखे असेच परिस्थितीने गांजलेले अनेक वृध्द रस्त्याकडेल्या मरणाची वाट पाहत असल्याचे दिसून येते. तरूणवयात मुलांना घरदार, चांगले आयुष्य देण्यासाठी रात्रंदिवस एक करत राबणार्‍या आईवडिलांना आज रस्त्यावर दिवस काढायला लागताहेत. ही शोकांकिका थांबणार तरी कधी? हा प्रश्न मात्र कायम आहे.

Back to top button