कोल्हापूर : त्या अल्पवयीन मुलांचे अपहरण झालेच नाही … | पुढारी

कोल्हापूर : त्या अल्पवयीन मुलांचे अपहरण झालेच नाही ...

गांधीनगर; पुढारी वृत्तसेवा :  मशिदीमध्ये नमाजला गेलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती; पण त्या मुलांना फूस लावून पळवून नेले अथवा त्यांचे अपहरण झाले नव्हते, तर ती मुंबईस फिरायला गेली होती, असे बुधवारी स्पष्ट झाले. ती मुले स्वतःहून मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी ताब्यात घेतले. अबूबक्कर मकबूल शेख (वय 15) व झुल्फिकार शब्बीर शेख (वय 14, दोघेही रा. बालाजी पार्क, मणेर मळा, उचगाव) अशी त्यांची नावे आहेत. मुले सुखरूप असल्याचे समजताच उचगाववासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अबूबक्करचे वडील मकबूल इस्माईल शेख (रा. मणेर मळा) यांनी मुलांना सोमवारी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी केवळ बारा तासांत घटनेचा छडा लावला. पोलिसांना मोबाईल लोकेशनवरून ही मुले मिरज रेल्वे स्टेशनवर असल्याचे समजले. रेल्वेने सोमवारी मुंबईस फिरण्यासाठी गेलो होतो. आम्हाला कोणीही फूस लावून अथवा अपहरण करून नेले नव्हते, असे अबूबक्कर शेख व झुल्फिकार शेख यांनी गांधीनगर पोलिसांसमोर कबूल केले.

 त्यांच्याजवळ पैसे नसल्याने मुंबईत त्यांना खाण्या-पिण्याची अडचण निर्माण झाल्याने परत ते रेल्वेने मिरजेला आले. पोलिसांना ते मिरजेत असल्याचे मोबाईल लोकेशनवरून समजताच तिथे जाऊन त्यांना अबूबक्करचे वडील मकबूल शेख यांनी ताब्यात घेतले.

फिरण्यासाठी गेली मुंबईला !

गांधीनगर पोलिसांनी अबूबक्कर शेख व झुल्फिकार शेख यांना बालकल्याण समितीसमोर उभे केले असता आपण फिरण्यासाठी मुंबईला गेलो होतो; आम्हाला कोणीही फूस लावून अथवा अपहरण करून नेले नव्हते, अशी कबुली दिली. त्यानंतर बालकल्याण समितीने या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यराज घुले व सहायक फौजदार राजू चव्हाण यांनी या मुलांचा छडा लावला. रात्री उशिरापर्यंत मुलांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते.

Back to top button