तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीने राज्यातील आरोग्य विभाग ‘अलर्ट’ | पुढारी

तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीने राज्यातील आरोग्य विभाग ‘अलर्ट’

कोल्हापूर;  विकास कांबळे : आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे राज्यातील आरोग्य विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. मात्र, आरोग्य विभागात केवळ मलईवर डोळा ठेवून काम करणार्‍या भ—ष्ट अधिकारी आणि कामचुकार बाबूंचे धाबे दणाणले आहे.

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकारी यांना ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या वतीने कोट्यवधीचा निधी जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. अनेक जिल्हा रुग्णालयांत अत्याधुनिक मशिनही उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु, या मशिन एक तर बरीच वर्षे धूळ खात पडत असतात किंवा सुरू झाल्यानंतर ती लवकर नादुरुस्त कशी होतील, हे पाहिले जाते. यामुळे गरिबांवर उपचार होऊ शकत नाहीत. आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार तर कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाहावयास मिळतो. अधिकारी येतात-जातात. परंतु, अधिकारी आलेले पण कळत नाहीत आणि गेलेलेही समजत नाही. परंतु, तुकाराम मुंढे त्याला अपवाद ठरत आहेत. आरोग्य विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबरोबर आरोग्य विभागात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कार्यालयीन शिस्तीच्या पालनाबाबत परिपत्रक काढले. त्यानंतर राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकारी यांची पहिली बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम केले तर निश्चितपणे त्यांच्या हाताखालील यंत्रणा प्रामाणिकपणे काम करेल आणि बदल निश्चित दिसेल, असे सांगितले.

गावातून, जिल्ह्यातून ज्यावेळी तुमच्यासाठी लोक आग्रह धरतील, हाच वैद्यकीय अधिकारी आम्हाला पाहिजे, असे ज्यावेळी चित्र निर्माण होईल त्यावेळी निश्चित तुम्हाला मिळणारे समाधान, हे वेगळे असेल. खासगी हॉस्पिटलपेक्षा आपल्या रुग्णालयात चांगल्या पद्धतीने सेवा कशा देता येतील, हे जिल्हा शल्यचिकित्सकांनी; तर ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्याधिकारी यांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यालयीन शिस्त पालनाबाबतही काढले परिपत्रक

कार्यालयीन शिस्तपालनाबाबतही त्यांनी परिपत्रक काढले आहे. वारंवार सूचना देऊनही बहुतांशी विभागप्रमुख, प्रादेशिक विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी शिस्तीचे पालन करत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे. ही बाब गैरवर्तणुकीत अंतर्भूत होते, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. विभागप्रमुख, प्रादेशिक विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख व इतर अधिकार्‍यांनी पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक सुट्टी दिवशीही मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button