कोल्हापूर : ऊस परिषद झाली, दर किती मिळणार? | पुढारी

कोल्हापूर : ऊस परिषद झाली, दर किती मिळणार?

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद संपन्न झाली. या परिषदेत राजू शेट्टी यांनी एफआरपी+350 ची मागणी केली आहे, तर गतवर्षी एफआरपी +200 रुपयांची मागणी केली होती. ती अद्याप कारखानदारांनी दिलेली नाही. हे 200 रुपये सर्व हिशेब करून 18 नोव्हेंबरपर्यंत द्यावेत, यासाठी ऊसतोडी बंद करण्यात येत आहेत.

दुसरीकडे अद्याप कारखानदारांनी दर जाहीर न करताच ऊसतोडी सुरू केल्याने रविवारी शिरोळ तालुक्यात ऊसतोडी बंद पाडल्या आहेत. त्यामुळे 21 व्या ऊस परिषदेत घोषणा केल्याप्रमाणे यावर्षी तरी एफआरपी+350 रुपये मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. सन 2002 साली ‘स्वाभिमानी’ने सर्वप्रथम उदगाव येथे ऊस परिषद घेतली. यावेळी कारखानदारांनी 460 रुपये दर जाहीर केला होता. ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे 700 रुपये दर मिळाला. त्यानंतर 2003 साली कारखानदारांनी 850 रुपये दर जाहीर केला; मात्र परिषदेननंतर 1150 रुपये मिळाले होते. सध्या शेतकर्‍यांना सरासरी 2900 रुपये दर मिळाला आहे.

आता राजू शेट्टी यांनी एफआरपी + 350 रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर मागील 200 रुपयांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘स्वाभिमानी’कडून सुरुवातीला भाजप आणि आता महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वबळावर ताकद उभारली जात आहे. अशात ऊस परिषदेलाही झालेल्या गर्दीमुळे शेतकर्‍यांचे पाठबळही दिसून आले आहे. देशव्यापी आंदोलनालाही ‘स्वाभिमानी’चे बळ मिळाले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे निवडून आले होते. त्यांनीही ‘स्वाभिमानी’बरोबर फारकत घेतली आहे. कोणत्याही पदाविना राज्यभरात ‘स्वाभिमानी’कडून शेतकरीहित जोपासले जात असले तरी शेतकर्‍यांच्या पदरात काही पडत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांनी आंदोलन केल्यामुळे 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान शेतकर्‍यांच्या पदरात पडल्याने समाधानही व्यक्त होत आहे.

रविकांत तुपकर नाराज?

मराठवाडा-विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांनी अनेक आंदोलने करत शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला आहे. शनिवारच्या ऊस परिषदेवेळी तुपकर यांची तब्येत बिघडली असल्याने ते येऊ शकले नाहीत, असा खुलासा ऊस परिषदेत केला होता. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील प्रशांत डिक्कर व रविकांत तुपकर यांच्यात काही मतभेद निर्माण झाल्याने तुपकर आले नव्हते. त्यामुळे राजू शेट्टी तुपकरांची नाराजी दूर करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

आता लोकसभेकडे लक्ष

राजू शेट्टी पुन्हा संसदेत जायला हवेत, यासाठी सर्व शेतकर्‍यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन अनेक नेत्यांनी ऊस परिषदेत केले. त्याचबरोबर परिषदेला झालेली गर्दी आणि सुरू असलेले प्रयत्न यातून लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होत आहे. या अनुषंगाने ‘स्वाभिमानी’ने तयारी सुरू केली आहे.

Back to top button