‘स्वाभिमानी’ने घोसरवाड येथे ऊसतोडी बंद पाडल्या | पुढारी

‘स्वाभिमानी’ने घोसरवाड येथे ऊसतोडी बंद पाडल्या

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा उसाला एफआरपी अधिक 350 रुपये दराची घोषणा करून तसे पत्र द्यावे. त्याशिवाय ऊस तोडू देणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोसरवाड (ता. शिरोळ) येथे खांडसरी साखर कारखान्याची ऊस तोडणी बंद पाडली. खांडसरी कारखान्यातर्फे शिरोळ तालुक्यात 18 ते 19 ठिकाणी ऊसतोड सुरू होती. ती ऊसतोड कारखान्याने थांबवत तुटलेला ऊस कर्नाटकातील कागवाड साखर कारखान्याकडे पाठवल्याचे खांडसरीच्या शेती अधिकार्‍यांनी सांगितले.

घोसरवाड येथील कुमार सुतार यांच्या शेतात ऊसतोड सुरू असल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद पाडल्या. दरम्यान, हेरवाड-तेरवाड रस्त्यावर इतर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना मज्जाव करत दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस तोडू नये, असे बजावले. खांडसरी कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर अडवून हवा सोडली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मलगोंडा पाटील, धुळगोंडा पाटील, अशोक पाटील, संजय अपराज, प्रभाकर बंडगर यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

Back to top button