‘लालपरी’ गेली लाडक्या बहिणींच्या 'इव्हेट'ला, विद्यार्थ्यांची वणवण
विशाळगड : कोल्हापूर येथील लाडकी बहीण योजनेच्या शासकीय कार्यक्रमासाठी सुमारे ३५ एसटी गाड्या पाठवण्यात आल्याने मलकापूर येथील आगारातून धावणाऱ्या बसेसच्या अनेक फेऱ्या गुरुवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांसह शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय सोसावी लागली. मर्यादित स्वरूपात एसटी फेऱ्या धावत असल्याने एसटीत जागा मिळवण्यासाठी झुंबड उडत होती. दरम्यान, येथील आगारात प्रवाशांची गर्दी झाली होती. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या कार्यक्रमामुळं प्रवाशांचे हाल, एसटीचं वेळापत्रक कोलमडलं असल्याचे दिसून आले.
कोल्हापूर येथे शासकीय कार्यक्रम असल्याने गुरुवारी काही फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, लांब पल्याच्या काही गाड्या वगळता इतर गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील महिलांना ने-आण करण्यासाठी एसटी बुक केल्याने अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या गेल्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे मुले शाळेला निघाली होती. माध्यमिक शाळांच्या चाचणी परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अनिवार्य होते. पण एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याचे समजले. मुलींना एसटीचे पास असल्यामुळे एसटी शिवाय जाणे अवघड झाले. काही गावांना वडाप जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चालत जावे लागले.
जागा मिळवण्यासाठी धावपळ
दरम्यान, काही एसटी फेऱ्यांशी निगडित असलेल्या ग्रामीण भागातील फेऱ्याही पर्यायाने धावल्या नसल्याने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. दुपारी शाळा, महाविद्यालय सुटल्यावर येथील आगारात प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने उपलब्ध गाड्यांवर ताण आल्याने एसटीमध्ये जागा मिळवण्यासाठी धावपळ सुरू होती.
प्रवाशांना खासगी वडापचाच पर्याय
एसटीच्या अनेक फेऱ्या बंद असल्यानं वयोवृद्ध प्रवाशी आणि पासधारक विद्यार्थ्यांना वडापचाच आधार घ्यावा लागला. गुरुवारी सकाळपासूनच अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं बसस्थानकांवर अनेक प्रवाशी ताटकळून गेले. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. गाड्या रद्द झाल्याचं कळताच प्रवाशांनी खासगी वडापचा आधार घेत घर गाठलं.
विद्यार्थ्यांची पायपीट
लालपरी’ लाडक्या बहिणींच्या कोल्हापूर येथील 'एव्हेंट'ला गेल्याने गजापुरातील विद्यार्थ्यांना पायपीट करत घर गाठावे लागले.