कोल्हापूर : बळीराजाची दिवाळी गोड | पुढारी

कोल्हापूर : बळीराजाची दिवाळी गोड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानापोटी द्यावयाची 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम उद्या (शुक्रवार)पासून संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जिल्ह्यातील एक लाख 29 हजार 260 शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे बळीराजाची दिवाळी गोड होणार आहे. दरम्यान, आणखी चाळीस हजार शेतकर्‍यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जफेड योजनेखाली शेतकर्‍यांचे थकीत पीककर्ज माफ केले होते. मात्र, त्यापूर्वी ज्यांनी नियमित कर्ज भरले होते, त्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये जेवढ्या कर्जाचा भरणा केला, तेवढे प्रत्यक्ष कर्ज किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेतून लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व मोठ्या संस्थांतील कर्मचारी आदींना वगळण्यात आले आहे.

जिल्ह्यातून 3 लाख 21 हजार 803 एवढ्या शेतकर्‍यांची प्रकरणे प्रोत्साहनपर अनुदान मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी निकषात बसलेल्या एक लाख 29 हजार 260 शेतकर्‍यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. या शेतकर्‍यांनी फेडलेले प्रत्यक्ष कर्ज किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये असे त्यांच्या खात्यावर शुक्रवारपासून जमा होतील. त्यासाठी संबंधित शेतकर्‍याला योजनेचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

शेतकर्‍यांची यादी सोसायटीत

ही योजना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली होती. मात्र कोरोना काळात आर्थिक ताण आल्यामुळे योजना लांबणीवर पडली. आता शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी शेतकर्‍याच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. पात्र शेतकर्‍यांची यादी सेवा सोसायटीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित शेतकर्‍यांनी आपली नावे तेथे जाऊन पाहावीत.

करवीर अव्वलच

प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यात करवीर तालुका अव्वल आहे. या तालुक्यातील 20 हजार 678 शेतकर्‍यांना फायदा मिळणार असून गगनबावडा तालुक्यात दोन हजार 270 लाभार्थी आहेत. ही संख्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे.

Back to top button