आदमापूर येथे सद्गुरू बाळूमामांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात! (Video)

मुदाळतिट्टा, पुढारी वृतसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा यांचा १३० वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल-कैताळाच्या गगनभेदी आवाजात जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. बाळूमामांच्या जन्मकाळ सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सद्गुरू बाळूमामा मंदिरामध्ये गाभाऱ्यात, समाधीस्थळ व मूर्तीची जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट उत्साहात करण्यात आली होती. बाळूमामांचा पाळणा झेंडू व जरबेरा फुलांनी सजवला होता. संपूर्ण मंदिरात व कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आदमापूर येथील ह.भ.प. नानासाहेब पाटील यांचे दुपारी कीर्तन झाले. काकड आरती, अभिषेक, समाधीचे पूजन आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर सायंकाळी ४ वा. २३ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.

यावेळी श्रींच्या पाळण्यावर भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. सुवासिनींनी पाळणा पूजन केले. पाळणा गीत गायिले. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सर्व भाविकांनी बाळूमामांचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी सुंठवडा वाटण्यात आला. तसेच बाळूमामांचे निर्वाणस्थळ श्री. मरगुबाई मंदिरामधून जन्म समाधी स्थळी श्रींच्या अश्वासह भंडारा आणून श्री चा पालखी सोहळा झाला. भाविकांनी व सुवासिनींनी पालखीचे व अश्वाचे औक्षण केले.

श्रींच्या पाळण्याचे पूजन देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. ढोल कैताळांच्या निनादामध्ये भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण झाली. यानंतर मंदीरा भोवती श्रींचा पालखी सोहळा झाला. जन्मकाळ सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली. यावेळी बाळूमामा देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, रावसाहेब कोणकेरी उपस्तित होते.

हेही वाचलंत का?

Exit mobile version