हद्दवाढ : शहरवासीयांच्याच जनमताचा रेटा वाढण्याची गरज | पुढारी

हद्दवाढ : शहरवासीयांच्याच जनमताचा रेटा वाढण्याची गरज

कोल्हापूर : सतीश सरीकर

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला कोल्हापूरच्या हद्दवाढीविषयी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केली. महापालिका प्रशासनाने 26 फेब्रुवारी 2021 ला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना शहर परिसरातील 1 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंतच्या 20 गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. दस्तुरखुद्द नगरविकास मंत्र्यांनीच प्रस्ताव पाठविण्याची सूचना केल्याने हद्दवाढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वास्तविक हद्दवाढ याआधीच होण्याची गरज होती. त्यासाठी आता शहरवासीयांच्याच जनमताचा रेटा वाढण्याची गरज आहे.

पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास

इंचाचीही हद्दवाढ न झाल्याने शहराची कोंडी झाली आहे. नागरीकरणाचा वेग वाढत आहे. रहिवास व औद्योगिक वापरासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे विकास विस्कळीत झालेला दिसून येतो. सध्या होत असलेल्या चतुरस्र वाढीबरोबरच शहरातील शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, प्रि- आय.ए.एस. प्रशिक्षण केंद्र, टी. ए. बटालियन, पोलिस विभागाकडील क्षेत्र, कृषी विभागाचे क्षेत्र, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडील आणि विविध ठिकाणी असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय इमारती, न्यू पॅलेस, मार्केट यार्ड, रेल्वे, एस. टी. विभागाकडील जागा, 70 झोपडपट्ट्यांचे क्षेत्र, 54 उद्याने, रंकाळा व राजाराम तलाव आदी क्षेत्रांनी कोल्हापूर व्यापले आहे. परिणामी शहरात विकासासाठी जागा उपलब्ध नाही.

सद्य:स्थितीत व्हर्टिकल डेव्हलपमेंट सुरू असून त्यांचीही मर्यादा आता गाठलेली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरनंतर विकास क्षमता असलेले कोल्हापूर शहर महत्त्वपूर्ण केंद्र आहे. जिल्ह्यात साखर कारखाने, सूत गिरण्या, वस्त्रोद्योग व यांत्रिकी स्वरूपाची कारखानदारी असल्याने औद्योगिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा केंद्र म्हणूनही शहराचा लौकिक आहे. प्रादेशिक व विभागीय कार्यालयांचे प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे. या सर्व घडामोडींमुळे कोल्हापूर शहराची वाढ रुंंदावत चालली असून त्याचा विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे.

कोल्हापूर शहर परिसरातील बहुतांश गावांना पाणीपुरवठा, ग्रामस्थांना भाजी विक्रीसाठी मंडई, ये-जा करण्यासाठी केएमटी, बाजारपेठ, सरकारी दवाखाने, शाळा-कॉलेज, मोफत स्मशानभूमी अशाप्रकारे प्रत्येक बाबीला कोल्हापूर शहराचाच आधार लागतो. कोल्हापूर शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागाची वीण इतकी घट्ट झालेली आहे. अनेक गावांची स्थिती कोल्हापूर शहरातच असल्यासारखी आहे. परंतु त्यांच्याकडून कोल्हापूर महापालिकेला सुविधा देऊनही कोणतेच कर मिळत नाहीत.

कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5 लाख 49 हजार 236 आहे. हद्दवाढीतील गावांची लोकसंख्या एकत्र केल्यास ती 7 लाख 66 हजार 109 इतकी होते. तसेच शहराचे सध्याचे क्षेत्रफळ 66.82 चौरस किलोमीटर असून हद्दवाढीनंतर ते 189.24 होणार आहे. याचा मोफा फायदा कोल्हापूर शहर व हद्दवाढी अंतर्गत येणार्‍या गावांना मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांतर्गत कोट्यवधींचा निधी मिळणार आहे. पर्यायाने कोल्हापूरची प्रगती होणार आहे.

1946 नंतर कोल्हापूरची एक इंचही हद्दवाढ नाही…

संस्थानकाळात 1854 ला कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना झाली. 15 डिसेंबर 1972 ला राज्य शासनाने नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केले. सन 1871 मध्ये शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे क्षेत्र अंंदाजे 9 चौ. कि. मी. होते. लोकसंख्या 37 हजार 662 तर उत्पन्न केवळ 11.035 रु. इतके होते. त्यानंतर सन 1941 मध्ये अंदाजे 17 चौ. कि. मी. इतके क्षेत्र झाले. त्यावेळी शहराची लोकसंख्या 92, 122 आणि उत्पन्न 3, 50, 000 रु. होते. सन 1946 ला शहराचे क्षेत्र 66.82 चौ. कि. मी. पर्यंत वाढले. म्हणजेच 1871 ते 1946 पर्यंत शहराच्या हद्दीत वाढ झाली. मात्र 1946 नंतर ते आजपर्यंत हद्दीत कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या 75 वर्षात लोकसंख्येत अनेकपटींनी वाढ झाली. परंतु हद्दवाढ 1946 ची म्हणजेच 66.82 चौ. कि. मी. इतकीच आहे.

स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या सुधारित सीमा

पूर्व : कोल्हापूर महापालिकेची प्रस्तावित हद्द नागाव उत्तर पूर्व कोपर्‍यापासून नागावच्या पूर्व हद्दीलगत. त्यानंतर नागाव दक्षिण हद्दीने कोल्हापूर सांगली रस्त्यापर्यंत, तेथून शिरोली पुलाची पूर्व हद्दीलगत पंचगंगा नदीपर्यंत. त्यानंतर नदीच्या दक्षिण पात्रालगत आणि वळिवडे-गांधीनगरच्या उत्तर व पूर्व हद्दीलगत. पुढे रेल्वे लाईनपर्यंत. तेथून वळिवडे गांधीनगर दक्षिण हद्दीने उचगावच्या पूर्व हद्दीलगत मुडशिंगी रोडपर्यंत आणि उजळाईवाडी पूर्व हद्दीने व तामगावचे उत्तर हद्दीने पुढे व तामगाव पूर्व हद्दीने सांगवडेवाडी रस्त्यापर्यंत. तेथून तामगाव दक्षिण हद्दीने पुढे गोकुळ शिरगाव दक्षिण हद्दीने राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पर्यंत.

दक्षिण : राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून गोकुळ शिरगावच्या दक्षिण हद्दीने व कंदलगावच्या दक्षिण हद्दीने पुढे कळंबे तर्फ ठाणे गावचे दक्षिण-पूर्व हद्दीने आणि दक्षिण हद्दीने कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गापर्यंत. तेथून पुढे कळंबे तर्फ ठाणेची दक्षिण-पश्चिम हद्दीने आणि वाशी गावचे दक्षिण हद्दीने कोल्हापूर-राधानगरी राज्य मार्गापर्यंत.

पश्चिम : कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गापासून वाशी गावचे दक्षिण आणि पश्चिम हद्दीने पुढे पाडळी खुर्द दक्षिण आणि पश्चिम हद्दीने उत्तरेस पंचगंगा नदीलगत गगनबावडा रोड ओलांडून उत्तरेस बालिंगा गावचे पश्चिम आणि उत्तर हद्दीने. तेथून कोल्हापूर महापालिका हद्दीने पंचगंगा नदीलगत. तेथून पंचगंगा नदी हद्दीने जठारवाडी दक्षिण-पूर्व हद्दीपर्यंत.

उत्तर : सध्याच्या कोल्हापूर महापालिका हद्दीप्रमाणे शिये तथा वडगावकडे जाणार्‍या रस्त्याने शिरोलीच्या उत्तर टोकाचे हद्दीपर्यंत आणि पुढे जठारवाडी रस्त्यापासून सध्याच्या कोल्हापूर महापालिका हद्दीने (पंचगंगा नदीचे हद्दीने) कोल्हापूर-शिये रस्त्यापर्यंत. तेथून कोल्हापूर-शिये रस्त्याने उत्तरेस शिरोली एमआयडीसी हद्दीपर्यंत. तेथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ने नागाव उत्तर-पश्चिम कोपर्‍यापर्यंत आणि तेथून नागावच्या उत्तर हद्दीने नागाव उत्तर-पूर्व कोपर्‍यापर्यंत.

असे होणार फायदे

पहिले वर्ष सर्व कर माफ
 दुसर्‍या वर्षापासून 20 टक्के कर
 पाच वर्षानंतर 100 टक्के कर
ग्रामपंचायतींचे कर्मचारी मनपाकडे
शासनाच्या परवानगीने नवी भरती
 शाळा जि.प.कडेच राहणार
जि.प.ने नकार दिल्यास मनपाकडे शाळा
सध्या असणाराच पाणीपुरवठा राहणार

Back to top button