कोल्हापूर : पुंगावमध्ये ट्रॅक्टर ट्रेलरला दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : पुंगावमध्ये ट्रॅक्टर ट्रेलरला दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा – पुंगाव (ता. राधानगरी) येथील रस्त्यावर लावलेल्या ट्रेलरला धडकून  मोटरसायकलस्वाराचा मृत्‍यू झाला.  नारायण मधुकर चांभार-पोवार ( रा. कंथेवाडी वय ३५) असे त्‍याचे नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून, ट्रॅक्टर मालक विद्याधर बापुसो पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नारायण हे गांधीनगर येथे कामास होते. रात्री काम आटोपून मोटरसायकल ( क्र.MHO9-CX-2492 )  कंथेवाडीस परतत होते. पुंगाव येथे मुख्य रस्त्यावर रस्त्याकडेला पार्कींग केलेल्या चारचाकी टँक्टर ट्रेलरला मोटरसायकलची धडक झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ट्रेलर न दिसल्याने मोटरसायकल ट्रेलरला धडकली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पुंगाव गावामध्ये मुख्य रस्त्यावर सर्रासपणे ट्रक, टँक्टर, ट्रेलर रस्त्यावर पार्कींग केले जातात. रस्त्यामध्ये पार्कींग केलेली वाहने दिसत नसल्याने अपघात घडतात. या पार्कींग केलेल्या ट्रेलरने  होतकरु नारायणचा बळी घेतला. त्यामुळे रस्त्यावर पार्कींग केलेल्या वाहनधारकांना पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना देण्याची मागणी होत आहे.

Back to top button