कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही अपुरा पाऊस | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही अपुरा पाऊस

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यावर्षीही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. सरासरीच्या 23.48 टक्के कमीच पाऊस झाला. गेल्या 18 वर्षांतील कमी पावसाचे हे तिसरे वर्ष ठरले आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या पावसाच्या चार महिन्यांत सरासरी 1,733.1 मि.मी. पाऊस होतो, यावर्षी तो 1,326.2 मि.मी. इतकाच झाला आहे. यामुळे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 76.52 टक्केच पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी होत आहे. सलग तिसर्‍या वर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडलेली नाही. गेल्या 18 वर्षांत केवळ सातच वर्षांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस कोसळणार्‍या गगनबावडा आणि राधानगरी या दोन तालुक्यांत सरासरी इतकाही पाऊस बसरला नाही. उलट सर्वात कमी पाऊस या दोन तालुक्यांत चार महिन्यांत पडला आहे.

पावसाचे वार्षिक प्रमाण कमी होत असतानाच कमी वेळात जादा पाऊस पडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. ढगफुटीसद़ृश पावसाचे प्रकार वाढत चालले आहे. सलग तीन वर्षे पावसाने सरासरी ओलांडली नाही. मात्र, अचानक पडलेल्या पावसाने 2019 आणि 2021 या साली सर्वात भीषण महापुराची नोंद झाली. पंचगंगेची कोल्हापुरात आजवरची सर्वोच्च पाणी पातळी 2021 मध्ये गाठली. यावर्षी मात्र पंचगंगा धोका पातळीपर्यंतही गेली नाही. पावसाचे कमी प्रमाण आणि धरणांतील पाण्याचे नियोजन, यामुळे जिल्ह्याला यावर्षी पुराचा फटका बसला नाही. जिल्ह्यातील प्रमुख 15 पैकी सहा धरण क्षेत्रांतच गतवर्षीपेक्षा आजअखेर जादा पाऊस झाला. मात्र, हा पाऊसही तुलनेने अधिक नाही.

कडगाव परिसरात सर्वाधिक पाऊस

कडगाव (ता. भुदरगड) परिसरात यावर्षी सरासरीच्या सर्वाधिक 265.55 टक्के इतका पाऊस झाला. आंबा (ता. शाहूवाडी) परिसरात 210.14 टक्के, तर करवीर तालुक्यातील सांगरूळ परिसरात सरासरीच्या 198.79 टक्के पाऊस झाला.

सर्वाधिक पावसाच्या तालुक्यांत कमी पाऊस

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यांत होतो. मात्र, या तालुक्यांत यावर्षी कमी पाऊस झाला आहे. यासह चंदगड, आजरा, पन्हाळा व शिरोळ या तालुक्यांतही सरासरी इतका पाऊस झालेला नाही. उर्वरित सहा तालुक्यांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला.

Back to top button