कोल्हापूरकरांचे घड्याळ पुन्हा शाहू मिलच्या भोंग्यावर | पुढारी

कोल्हापूरकरांचे घड्याळ पुन्हा शाहू मिलच्या भोंग्यावर

कोल्हापूर, आशिष शिंदे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरद़ृष्टीने सुरू केलेली शाहू मिल 2003 मध्ये बंद झाली अन् सार्‍या कोल्हापूरकरांच्या घड्याळाचे काटे ज्या मिलच्या भोंग्याच्या आवाजवर लावले जायचे तो आवाजही शांत झाला; मात्र तब्बल 19 वर्षांनंतर राजर्षी शाहू स्मृती शताब्दीदिनी 6 मे 2022 रोजी शाहू मिलची अस्मिता असणारा भोंगा वाजला आणि सारे शहरवासीय गहिवरून गेले. राजर्षी शाहू विचार व जतन समितीच्या पाठपुराव्यामुळे शहरवासीयांना आता आपल्या आगळ्यावेगळ्या घड्याळ्याचा आवाज पुन्हा दररोज ऐकायला मिळणार आहे. राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून परवानगी मिळाली असून मुंबई डॉकयार्ड येथून आणण्यात आलेला अत्याधुनिक इलेक्ट्रिक भोंग्याचा आवाज आता सर्वदूर घुमणार आहे.

छत्रपती शाहू महाराज यांनी 27 सप्टेंबर 1906 रोजी प्रथम भोंगा वाजवून शाहू मिलची सुरुवात केली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट 2003 रोजी शेवटचा भोंगा वाजला. त्यानंतर तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा मिलच्या भोंग्याचा आवाज सर्वदूर पोहोचणार आहे. मावळा कोल्हापूर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून शाहू शताब्दी वर्षानिमित्त भोंगा वाजविण्याचे नियोजन केले होते. त्यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: वर्गणी जमा करून एक लाख रुपये खर्च करून हा भोंगा वाजविण्याचे नियोजन केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भोंग्याचा वापर करण्यात आला होता.

राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाने दररोज मिलचा भोंगा वाजवण्यास परवानगी दिली आहे. भोंगा वाजवण्यापुर्वी काही अटींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता संबंधित यंत्रणांना पत्रे पाठवण्यात आली आहेत, तसेच महिन्याचे वीज बिल, संरक्षणाच्या खर्चाची जबाबदारी समितीची राहणार आहे. तांत्रिक बाबी आणि आवश्यक अटींची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक भोंग्याचा होणार वापर

शाहू मिलचा भोंगा वाफेवर चालणारा होता. त्याकरिता बॉयलरचा वापर होत होता. काळानुरूप बॉयलर यंत्रणा खराब झाल्याने वाफेवर चालणारा भोंगा पूर्ववत करणे शक्य नसल्याचे मिलमधील कर्मचार्‍यांनी सांगितले. याकरिता मावळा संघटनेच्या वतीने आणण्यात आलेल्या इलेक्ट्रिक भोंग्याची पाहणीदेखील करण्यात आली आहे. या भोंग्याच्या आवाजाचा परिघ आठ किलोमीटर इतका आहे. याचा आवाज भोंग्याच्या दोन्ही बाजूला 4 किलोमीटरपर्यंत ऐकू जातो. या भोंग्याचा वापर केला जाण्याची अपेक्षा आहे.

Back to top button