माध्यमिक पे-युनिटचा कारभार चव्हाट्यावर! | पुढारी

माध्यमिक पे-युनिटचा कारभार चव्हाट्यावर!

कोल्हापूर; प्रवीण मस्के :  वैद्यकीय बिले, फंडाच्या रकमा यांसह विविध प्रकरणे पूर्ण करून घेण्यासाठी माध्यमिक पे-युनिटमध्ये दर निश्चित असल्याचे बोलले जाते. सेवानिवृत्त सहायक शिक्षकाची फंडाची रक्कम काढण्यासाठी 23 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी पे-युनिटमधील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. खाबूगिरीमुळे पे-युनिटचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

माध्यमिक पे-युनिटमध्ये अधीक्षक व आठ ते दहा अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचे विभागावर नियंत्रण असते. शिक्षण उपसंचालक, अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांच्या सहीने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची सर्व प्रकारची बिले काढली जातात. मासिक पगार, वैद्यकीय बिले मंजुरी, वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करून फरक बिले काढणे, निवड श्रेणी मंजूर करून बिले काढणे, प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमा जमा करून मागणीनुसार शिक्षण व लग्न कार्यासाठी बिले काढणे, पेन्शन मंजूर झाल्यानंतर नंतर फरकासह बिले काढणे, ग्रॅच्युईटी बिले काढणे, रजा रोखीकरण बिले काढणे, डीसीपीएस रकमा जमा करणे, सर्व प्रकारची फरकांची बिले काढणे आदी कामे माध्यमिक पे-युनिटमध्ये चालतात.

पे-युनिटमधून 13 हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची विविध प्रकारची बिले अदा केली जातात. मागील वर्षातील 2021-22 मधील सुमारे 700 बिले अनुदानाअभावी प्रलंबित आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त विविध प्रकरणे मंजूर करून घेण्यासाठी पे-युनिटमध्ये येतात. याच्या रकमा लाखोंच्या घरात असतात. मात्र, काही जणांकडून बिले मंजूर करून घेण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जाते. त्याशिवाय फाईल पुढे पाठविली जात नसल्याची चर्चा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये आहे.

Back to top button