कोल्हापूर : चैतन्यदायी नवरात्रौत्सवास प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर : चैतन्यदायी नवरात्रौत्सवास प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सनई-चौघड्यांचे मंगल सूर, धार्मिक मंत्रोच्चार, चैतन्यदायी व मंगलमय वातावरण आणि अंबामाता की जय… असा जयघोष करणार्‍या आबालवृद्ध भाविकांच्या उपस्थितीत, भक्तिमय वातावरणात सोमवारी नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी, शहरातील विविध पेठा व उपनगरांतील नवदुर्गांसह विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सोमवारी पहाटे 4 वाजता, मंदिरात चोपदारांकडून घंटानाद करून विविध धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली. हक्कदार पूजक यांनी देवालय उघडल्यानंतर वहिवाटदार पुजार्‍यांनी खडीसाखर-लोणी नैवेद्य दाखविला. मंदिरातील दैवतांच्या एकारती व कापूर आरतीनंतर साडेपाच वाजता, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. परंपरेप्रमाणे 8 वाजता घटस्थापना खातेदार श्रीपूजक शेखर मुनिश्वर यांनी मुख्य पुरोहित किरण लाटकर यांच्याकडून करून घेतली. यानंतर परंपरेप्रमाणे जाधव कुटुंबीयांकडून तोफेची सलामी देऊन नवरात्रौत्सवास प्रारंभ झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यानंतर शहर व जिल्ह्यातील विविध देव-देवतांच्या मंदिरांत आणि घराघरांत घटस्थापना झाली. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते अंबाबाईची आरती झाली. यानंतर 11 वाजता अभिषेकानंतर दुपारच्या सत्रात देवीची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली.

दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच नवरात्र मंडळांच्या वतीने मशाल ज्योती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ‘अंबामाता की जय…’ अशा घोषणा देत भगवे ध्वज घेऊन एकसारखी वेशभूषा केलेले कार्यकर्ते आपापल्या गावांकडे रवाना होत होते. मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रणासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त व देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक तैनात होते. दर्शनरांगेतून भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत होता. मंदिर परिसरात देवस्थान समितीच्या कार्यालयाजवळ दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये ठिकठिकाणांहून आलेल्या विविध संस्था-संघटनांनी आपली सेवा बजावली.

सिंहासनारूढ अंबाबाई…

मार्कंडेय पुराणांतर्गत ‘देवी माहात्म्या’तील दुर्गा सप्तशतीच्या 11 व्या अध्यायातील श्लोक 55 मध्ये ज्या-ज्यावेळी दानवांकडून उपद्रव होईल, त्या-त्यावेळी मी अवतार घेऊन शत्रूसंहार (म्हणजे दानवांचा संहार) करीन, धर्मपालनास उपद्रव होऊ नये म्हणून अशा असुरी शक्तींचा निःपात करीन, असे देवीचे वचन आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही सर्वस्याद्या होय. नवरात्रातील प्रतिपदेस तिची सिंहासनारूढ रूपात पूजा बांधली जाते. सिंह हे शौर्य, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य, सत्ता यांचे प्रतीक आहे. सिंहासनावर विराजमान होणारे देव व राजे हे सार्वभौमत्व दर्शवितात. श्री अंबाबाई ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश आहे, अशी श्रद्धा असल्यामुळेच सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती. ‘राजराजेश्वरी’ स्वरूपात भक्तांना मनोवांच्छित फल प्रदान करण्यासाठी सिंहासनावर विराजमान आहे. अत्यंत वैभवशाली व प्रसन्न असे हे देवीचे रूप द्विभूज आहे. उजव्या हाताने ती आशीर्वाद व अभय देत आहे, तर डाव्या हातात कमळ आहे. कमळ हे सौंदर्य, ज्ञान आणि पावित्र्य यांचे प्रतीक आहे. ही पूजा श्रीपूजक अनिल कुलकर्णी, नारायण ऊर्फ आशुतोष कुलकर्णी, गजानन मुनिश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

पहिल्या दिवशी 75 हजार भाविकांनी घेतले दर्शन

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिरात दिवसभरात सुमारे 75 हजार भाविकांनी दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही यंत्रणेत त्याची नोंद झाली आहे. मंगळवारपासून दर्शनासाठी गर्दी वाढणार असल्याने त्याद़ृष्टीने देवस्थान समितीने तयारी केली आहे.

Back to top button