कोल्हापूर : तुळजाभवानीसह नवदुर्गा मंदिरांत नवरात्रौत्सवास प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर : तुळजाभवानीसह नवदुर्गा मंदिरांत नवरात्रौत्सवास प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जुना राजवाड्यातील छत्रपतींची कुलदैवत तुळजाभवानी, त्र्यंबोली, फिरंगाई, महाकाली, कात्यायणी देवींसह शहर परिसरातील नवदुर्गा आणि इतर विविध देवदेवतांच्या मंदिरांमध्येही सोमवारी नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये धार्मिक विधी सुरू होते. यानंतर घटस्थापना करण्यात आली. दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवरात्रौत्सव काळात विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जुना राजवाड्यात नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबादेवघरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची अश्वारूढ असलेली व सुगीच्या धान्याची आकर्षक पूजा बांधण्यात आली. संभाजीराजे, सौ. संयोगीताराजे, सौ. मधुरिमाराजे यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी झाले.

पालखी भेटीच्या सोहळ्यास प्रारंभ

दरम्यान, छत्रपती देवस्थान ट्रस्टतर्फे घटस्थापनेदिवशी पालखी भेटीच्या सोहळ्यांनाही सुरुवात झाली. पहिल्या दिवशी (सोमवार) करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या भेटीचा सोहळा झाला. 27 सप्टेंबर रोजी पंचगंगा नदी काठावरील संस्थान शिवसागर, 28 सप्टेंबर रोजी खोलखंडोबा येथील गजेंद्रलक्ष्मी, 29 रोजी एकवीरा रावणेश्वर मुक्तांबिका, 30 सप्टेंबर रोजी कवाळपंचमी दिनी त्र्यंबोली देवी, 1 ऑक्टोबर रोजी पद्मावती मंदिर, 2 ऑक्टोबर रोजी विठ्ठल व रंकोबा मंदिर, 3 ऑक्टोबर रोजी नगर प्रदक्षिणा, 4 ऑक्टोबर रोजी खंडेनवमी आणि 5 ऑक्टोबर रोजी विजया दशमी दसर्‍याची पालखी मिरवणूक होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता

नवरात्रौत्सव काळात जुना राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याची सुरुवात सोमवारी झाली. कीर्तनकार राधिका कालेकर यांनी भारूड सादर केले. 27 रोजी शाहीर युवराज पुजारी (वाशी) धनगरी ओवी सादर करतील. 28 रोजी शाहू संगीत विद्यालयाचे अरुण जेरे यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 29 रोजी स्वरदा भजनी मंडळाचा कार्यक्रम, 30 सप्टेंबर रोजी अमोल राबाडे यांचे बासरी व तबलावादन होईल. दि. 1 ऑक्टोबर रोजी सौ. कविता नायर यांचे भरतनाट्यम, दि. 2 रोजी राष्ट्रीय शाहीर संजय जाधव (मिणचे) यांचा कार्यक्रम, दि. 3 रोजी शिवराज पाटील व डॉ. मनीषा नायकवडी यांचा ‘भजन संध्या’ कार्यक्रम होणार आहे.

Back to top button